इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूनं लागला खरा. पण शुबमन गिलच्या विक्रमांची 'बरसात' करणाऱ्या द्विशतकी खेळीसह यशस्वी जैस्वाल, रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी केलेल्या उपयुक्त अन् दमदार खेळीच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या डावात धावांचा डोंगर उभारला आहे. लीड्सच्या कसोटी सामन्यातील पराभवाचा वचपा काढण्यासाठी भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात ५८७ धावा केल्या आहेत. यात भारतीय कर्णधार शुबमन गिलनं नेतृत्वाला साजेशी कामगिरी करत आपल्या फलंदाजीतील कर्तृत्व दाखवून दिले. शुबमन गिलचं त्रिशतक हुकलं ही खंत सोडली तर पहिल्या डावात सगळं अगदी ओकेमध्ये झालं
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
दुसऱ्या दिवसाच्या खेळात या तिघांची दमदार बॅटिंग
शुबमन गिल आणि रवींद्र जडेजा या जोडीनं ५ बाद ३०५ धावांवरून दुसऱ्या दिवसाच्या खेळाची सुरुवात केली. या जोडीनं सहाव्या विकेटसाठी २०३ धावांची भागीदारी रचत भारतीय संघाला चारशेचा टप्पा पार करून दिला. रवींद्र जडेदा रवींद्र जडेजा १३७ चेंडूत ८९ धावांची दमदार खेळी करून तंबूत परतला. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदरसोबत शुबमन गिलनं १४४ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. या जोडीच्या दमदार भागीदारीच्या जोरावर भारतीय संघाने ५०० धावांचा टप्पा पार केला. वॉशिंग्टन सुंदरने १०३ चेंडूत ४२ धावांची खेळी केली.
शुबमन गिलंच त्रिशतक हुकलं
शुबमन गिल त्रिशतकाच्या दिशेनं वाटचाल करत होता. तो अगदी सहज हा डाव साधणार, असे वाटत असताना जोश टंगच्या गोलंदाजीवर तो झेलबाद झाला. त्याने ३८७ चेंडूत २६९ धावांची खेळी केली. या तिघांशिवाय पहिल्या दिवसाच्या खेळात यशस्वी जेस्वालनं १०७ चेंडूत केलेल्या ८७ धावांची खेळी आणि करुण नायरनं ३१ धावांचे योगदान दिले. इंग्लंडकडून शोएब बशीनं सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. याशिवाय क्रिस वोक्स आणि जोश टंग यांना प्रत्येकी २-२ तर ब्रायडन कार्स, बेन स्टोक्स आणि जो रुट यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली.