नॉटिंगहॅम - ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळवण्यात आलेल्या तिसऱ्या वनडेत इंग्लंडने 50 षटकात 6 बाद 481 धावा फटकावत एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात मोठ्या धावसंख्येची नोंद केली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाला 239 धावांत गुंडाळत इंग्लंडने 242 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात अनेक विक्रमांची नोंद झाली. त्यातील ठळक विक्रमांचा घेतलेला आढावा.
- 481 एकदिवसीय क्रिकेटमध्ये एखाद्या संघाने एका डावात उभारलेली सर्वात मोठी धावसंख्या. 481 धावांचा डोंगर उभा करताना इंग्लंडने याच मैदानावर पाकिस्तानविरुद्ध उभारलेला 444 धावांचा आपलाच विश्वविक्रम मोडीत काढला.
- एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात एका डावात 400 हून अधिक धावा फटकावल्या जाण्याची ही 19 वी वेळ होती.
- एका डावात 400 हून अधिक धावा फटकावण्याची कामगिरी सर्वाधिक वेळा दक्षिण आफ्रिकेने केली आहे. दक्षिण आफ्रिकेने सर्वाधिक सहा वेळा एका डावात 400 हून अधिक धावा फटकावल्या आहेत. तर भारताने पाच वेळा आणि इंग्लंडने तीन वेळा एका डावात 400 हून अधिक धावा फटकालल्या आहे.
- ऑस्ट्रेलियाच्या ऑण्ड्रयू टायने 9 षटकात 100 धावा दिल्या. एका डावात सर्वाधिक धावा देणारा तो 12 वा गोलंदाज ठरला.
- या लढतीत इंग्लंडने 242 धावांनी विजय मिळवला. धावांचा विचार करता एकदिवसीय क्रिकेटमधील इंग्लंडचा हा सर्वात मोठा विजय आहे. याआधी इंग्लंडने 2015 साली न्यूझीलंडचा 210 धावांनी पराभव केला होता.
- 242 धावांनी झालेला पराभव हा एकदिवसीय क्रिकेटमधील ऑस्ट्रेलियाचा हा सर्वात मोठा पराभव ठरला. याआधी 1986 साली ऑस्ट्रेलियाला न्यूझीलंडकडून 206 धावांनी पराभूत व्हावे लागले होते.