Join us

ENGvPAK : जॉनी बेअरस्टो सुसाट... इंग्लंडच्या फलंदाजांनी पाकिस्तान संघाला धू धू धुतले

ENG PAK: आगामी वर्ल्ड कप स्पर्धेत धावांचा धो धो पाऊस पडणार हे निश्चित आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2019 10:30 IST

Open in App

ब्रिस्टॉल, इंग्लंड वि. पाकिस्तान : आगामी वर्ल्ड कप स्पर्धेत धावांचा धो धो पाऊस पडणार हे निश्चित आहे. सध्या इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील वन डे सामन्यांतील धावांतून त्याची प्रचिती येत आहे. पाकिस्तानने उभे केलेले 358 धावांचे लक्ष्य इंग्लंडच्या खेळाडूंनी 6 विकेट आणि 31 चेंडू राखून सहज पार केले. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये धावांचा रतीब रचणाऱ्या जॉनी बेअरस्टोची बॅट राष्ट्रीय संघाकडूनही चांगलीच तळपली. त्याच्या तुफानी खेळीला अन्य फलंदाजांची तोडीस तोड साथ मिळाली. या विजयासह पाच सामन्यांच्या मालिकेत यजमान इंग्लंडने 2-0 असी आघाडी घेतली आहे.

पाकिस्तानचा हा वन डेतील सलग सातवा फराभव आहे आणि विशेष म्हणजे या सातही सामन्यांत त्यांच्या संघात एक शतकवीर राहिला आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या गोलंदाजांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. इंग्लंडने या वर्षात तिसऱ्यांदा 350 हून अधिक लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करण्याचा पराक्रम केला आहे.

पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 9 बाद 358 धावांचा डोंगर उभा केला.  इमाम-उल-हक या सामन्यात चांगलाच खेळला. पाकिस्तानचे आघाडीचे फलंदाज माघारी गेले असतान इमामने धैर्याने इंग्लंडच्या गोलंदाजांचा सामना करत 151 धावांची खेळी साकारली. त्याने 131 चेंडूंत 16 चौकार व 1 षटकार खेचला. त्याला हॅरिस सोहैल ( 41) व आसीफ अली ( 52) यांची उत्तम साथ लाभली.

पण, हे मोठे लक्ष्य इंग्लंडने सहज पार केले. जेसन रॉय आणि बेअरस्टो यांनी दीडशतकी भागीदारी करून देताना इंग्लंडला मजबूत पाया रचून दिला. रॉयने 55 चेंडूंत 8 चौकार व 4 षटकारांसह 76 धावांची खेळी केली. त्यानंतर बेअरस्टोनं पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई केली. त्याने 93 चेंडूंत 15 चौकार व 5 षटकार खेचत 128 धावा चोपल्या. त्याला जो रूट ( 43), बेन स्टोक्स ( 37) आणि मोईन अली ( 46*) यांची उत्तम साथ लाभली. इंग्लंडने 44.5 षटकांत 4 फलंदाज गमावून हे लक्ष्य पार केले. 

टॅग्स :इंग्लंडपाकिस्तानवर्ल्ड कप २०१९