मुंबई : कर्णधार विराट कोहली सध्या सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाचा भाग नाही. त्याची मैदानावरील आक्रमकता, दिल्लीकर असल्याने तोंडावर सतत असणाऱ्या शिव्या, प्रतिस्पर्धी खेळाडूंना ठसन देऊन खेळण्याची स्टाईल, हे सर्व आशिया चषक स्पर्धेत चाहते मिस करत आहेत. पण मैदानावर आक्रमक दिसणारा विराट खऱ्या आयुष्यात कसा आहे, हे फार कमी लोकांना माहीत आहे. विराटही आपले खाजगी आयुष्य कोणाला सांगत नाही. त्यामुळे वरवर आक्रमण, निडर असलेला विराट आतनं मात्र भावनिक आहे, हे सांगितले तर पटणार नाही.
क्रिकेटपासून काही काळ आता दूर असलेला विराट सध्या पत्नी अनुष्का शर्माला वेळ देण्याबरोबरच अन्य कमिटमेंटही पूर्ण करण्याच्या मागे लागला आहे. अशाच एका कमिटमेंटमध्ये विराटचे भावुक रूप समोर आले. एका वाहिनीने तयार केलेल्या डॉक्युमेंटरीत विराट व्यक्त झाला आणि त्याने आयुष्यातील एक घटना व्यक्त केली. वडिलांचे निधन, आयुष्यातील या घटनेने पूर्वी व्यक्त होणारा विराट हरवला आणि जगासमोर बिनधास्त, बेधडक असा विराट उभा राहिला.
"माझ्या मांडीवर बाबांनी प्राण सोडला. पहाटेचे तीन वाजले होते. रणजी क्रिकेट स्पर्धेचा सामना संपवून मी घरी आलो होतो आणि दुसऱ्या दिवशी मला पुन्हा फलंदाजीला जायचे होते. वडिलांना वाचवण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न केले. शेजाऱ्यांकडून, ज्यांना ज्यांना आम्ही ओळखत होतो अशा सगळ्यांकडून आम्ही मदत मागितली. पण रात्रीच्या वेळी कोणाकडून प्रतिसाद मिळाला नाही. ॲम्बूलन्स आणि अन्य सर्व जेव्हा आले, तेव्हा बाबा गेले होते," असे विराटने त्या डॉक्युमेंटरीत सांगितले आहे.
याच एका घटनेने विराटला संपूर्ण बदलले. या प्रसंगानंतर विराटने लक्ष्याभवती अधिक केंद्रित झाला. आयुष्यात अन्य गोष्टी करण्याची इच्छाच तो गमावून बसला होता आणि त्याने सर्व शक्ती एक उत्तम क्रिकेटपटू बनण्यासाठी लावली. हीच वडिलांची अंतिम इच्छा होती.