गेल्या काही दिवसांपासून भारतामध्ये हृदविकाराच्या झटक्यामुळे तरुणांचा मृत्यू होण्याच्या घटना लक्षणीयरीत्या वाढल्या आहेत. दरम्यान, अशीच एक घटना पश्चिम बंगालमध्ये घडली आहे. बंगालमधील उगवता क्रिकेटपटू प्रियजित घोष याचा जिममध्ये हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला. प्रियजित अवघ्या २२ वर्षांचा होता. त्याच्या मृत्युमुळे स्थानिक क्रिकेट जगतात आणि त्याच्या कुटुंब आणि मित्रपरिवारामध्ये शोककळा पसरली आहे.
प्रियजित घोष हा पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील बोलपूर येथील रहिवासी होता. पश्चिम बंगालच्या क्रिकेट संघाकडून खेळण्याचं स्वप्न त्याने बाळगलं होतं. तसेच देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगला खेळ करून एकेदिवशी भारतीय क्रिकेट संघाकडून खेळण्याचं त्याचं लक्ष्य होतं. मात्र काळाने ही संधी त्याच्याकडून हिरावून घेतली.
प्रियजित घोष हा बोलपूर येथील मिशन कंपाऊंड एरियामध्ये असलेल्या एका जिममध्ये गेला होता. तिथे व्यायाम करत असतानाच त्याला हृदयविकाराचा तीव्र झटला आला. त्यामुळे त्याची प्रकृती बिघडली. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्याला वाचवता आलं नाही. प्रियजित याच्या मृत्यूमुळे क्रिकेट जगतात शोककळा पसरली आहे.