इंडियन प्रीमियर लीगकडे केवळ एक खेळ म्हणून नाही, तर एक उत्सव म्हणून पाहिले जाते. मात्र, लखनौच्या भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियममधील एका व्हायरल व्हिडिओने या उत्सवाच्या नावाखाली प्रेक्षकांची लूटमार केली जात असल्याचे उघड झाले आहे. एका तरुणाने सामन्यत: २० रुपयांना मिळणारी पाण्याची बॉटल चक्क १०० रुपयांना विकली जात असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे बाहेरून अन्न किंवा पाण्याची बाटली नेण्यास सुरक्षेच्या कारणास्तव बंदी असल्याने, तहानेने व्याकुळ झालेल्या चाहत्यांना नाईलाजास्तव ही अव्वाच्या सव्वा किंमत मोजावी लागत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये एका तरुणाने स्टेडियममधील अवाजवी दरांचा पर्दाफाश केला. या तरुणाने दाखवून दिले की, बाहेर २० रुपयांना मिळणारी पाण्याची बाटली आत चक्क १०० रुपयांना विकली जात आहे. तर, २० रुपयांचे चिप्सचे पाकिटसाठी ६० ते ७० रुपये मोजावे लागत आहेत. मात्र, यामुळे संतप्त झालेल्या काही चाहत्यांनी स्टेडियममध्ये काहीही खरेदी न करण्याचे किंवा थेट सामन्यांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे. हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे? हे अद्याप समजू शकलेले नाही.
या प्रकरणामुळे आयपीएल आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात असल्याची भीती व्यक्त होत आहे. टीव्ही आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकसंख्येचे विक्रम मोडले जात असले, तरी प्रत्यक्ष मैदानावर येणारा सामान्य नागरिक मात्र या वाढत्या व्यापारीकरणात भरडला जात आहे. आता या प्रकरणाची दखल घेऊन आयपीएल आयोजक किंवा एकाना स्टेडियम प्रशासन खाद्यपदार्थांच्या किमतींवर काही नियंत्रण आणणार का? की चाहत्यांची ही लूट अशीच सुरू राहणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नेटकऱ्यांची प्रतिक्रिया
या व्हिडिओनंतर नेटकऱ्यांनी आयपीएल आयोजक आणि स्थानिक प्रशासनावर टीकेची झोड उठवली आहे. "बाहेरून पाणी नेण्यास बंदी आणि आत महागडे दर, ही चाहत्यांची एक प्रकारे अडवणूक आहे", असे एका व्यक्तीने म्हटले आहे. दुसऱ्या व्यक्तीने म्हटले आहे की, "आयपीएलला हजारो कोटींचे प्रायोजकत्व मिळत असताना, सामान्य चाहत्यांच्या खिशाला कात्री का लावली जात आहे?" आणखी एका व्यक्तीने म्हटेल आहे की,"तिकीट आणि प्रवासासाठी आधीच मोठा खर्च करणाऱ्या सामान्य चाहत्याला मूलभूत गोष्टींसाठी अशा प्रकारे जास्तीचे पैसे मोजावे लागणे, हे अत्यंत लाजिरवाणे आहे."