Join us
Daily Top 2Weekly Top 5

एजाज पटेल: ‘परफेक्ट टेन’ अन्‌ आऊट ऑफ इलेव्हन; भारताविरुद्ध डावात १० बळी घेऊनही संघाबाहेर

पटेलने भारताविरुद्ध ११९ धावांत १० बळी घेत जिम लेकर आणि अनिल कुंबळे यांच्या विश्वविक्रमी कामगिरीची बरोबरी केली होती.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2021 08:11 IST

Open in App

ख्राईस्टचर्च : भारताविरुद्ध मुंबईत झालेल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात सर्व दहा फलंदाजांना बाद केलेला फिरकीपटू एजाझ पटेल याला न्यूझीलंड संघाने बांगलादेशविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी संघात निवडले नाही. पटेलने भारताविरुद्ध ११९ धावांत १० बळी घेत जिम लेकर आणि अनिल कुंबळे यांच्या विश्वविक्रमी कामगिरीची बरोबरी केली होती.

एक जानेवारीपासून न्यूझीलंड घरच्या मैदानावर बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. मात्र, यासाठी पटेलची १३ सदस्यीय न्यूझीलंड संघात निवड न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दोन्ही कसोटी सामने माउंट माँगानुई येथील बे ओव्हल आणि ख्राईस्टचर्च येथील हेगले ओव्हल येथे खेळविण्यात येणार असून येथील खेळपट्ट्या वेगवान गोलंदाजीस पोषक मानले जातात. त्यामुळेच परिस्थिती लक्षात घेऊन न्यूझीलंडने ट्रेंट बोल्ट, टिम साऊदी, काएल जेमिसन, नील वॅगनर आणि मॅट हेन्री या वेगवान गोलंदाजाना संघात स्थान दिले आहे. विशेष म्हणजे, फिरकीची जबाबदारी अष्टपैलू राचिन रवींद्र याच्याकडे देण्याकडे आली आहे.’

‘परिस्थिती लक्षात घेऊन बांगलादेशविरुद्ध मालिकेसाठी मला स्थान न मिळाल्याचे मी समजू शकतो. पण, देशात फिरकी गोलंदाज घडविण्याची गरज लक्षात घेऊन भविष्यात मैदान कर्मचाऱ्यांनीही फिरकीस लाभदायी ठरणाऱ्या खेळपट्ट्या बनवल्या पाहिजेत,’ अशी प्रतिक्रिया  फिरकी गोलंदाज एजाझ पटेल याने दिली.

टॉम लॅथम करणार नेतृत्व!

- कोपऱ्याच्या दुखापतीतून अद्याप सावरू न शकलेला कर्णधार केन विलियम्सन बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत खेळणार नसल्याची माहिती न्यूझीलंड संघाने दिली. त्याच्या अनुपस्थितीत सलामीवीर टॉम लॅथम किवी संघाचे नेतृत्व करेल. तसेच डिवोन कॉनवे याने दुखापतीतून सावरत संघात पुनरागमन केले आहे. टी-२० विश्वचषक स्पर्धेदरम्यान तो दुखापतग्रस्त झाला होता. 

टॅग्स :न्यूझीलंड
Open in App