ECB offers BCCI option to host IPL 2025 matches in England : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेला ब्रेक लागला आहे. बीसीसीआयने आठवड्याभरासाठी स्पर्धा स्थगित करण्यात आल्याची अधिकृत घोषणा केलीये. स्पर्धेसंदर्भात पुढे काय निर्णय घेतला जाणार? याची चर्चा रंगत असताना आता इंग्लंड आणि वेल्स (ECB) क्रिकेट बोर्डानं बीसीसीआयला खास ऑफर दिल्याची माहिती समोर येत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाची बीसीसीआयला ऑफर
'द गार्डियन'च्या वृत्तानुसार, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने भारताच्या इंग्लंड दौऱ्यानंतर सप्टेंबरमध्ये आयपीएल २०२५ च्या उर्वरित सामन्यांचे आयोजन करण्यासंदर्भातील प्रस्ताव भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) दिला आहे. ईसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रिचर्ड गोल्ड यांनी बीसीसीआयच्या त्यांच्या संपर्क साधून स्पर्धा पार पाडण्यासाठी पाठिंबा देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे म्हटले आहे. या प्रस्तावानुसार, पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील रद्द झालेल्या सामन्यासह प्लेऑफ्समधील लढती खेळवण्याची तयारी दर्शवण्यात आलीये.
रोहित शर्मानंतर विराट कोहलीचाही कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय? BCCI ला दिली माहिती
..तर सप्टेंबरमध्ये IPL मधील उर्वरित सामने खेळवणे होईल शक्य
ईसीबीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, सप्टेंबरमध्ये एक विंडो (आयपीएल खेळवण्यासाठीचा कालावधी) उपलब्ध होऊ शकते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट वेळापत्रकानुसार, भारत त्यावेळी आशिया कपचे आयोजन करणार आहे. परंतु सध्याच्या वातावरणात ही स्पर्धा होण्याची शक्यता कमी दिसते. त्याच कालावधीत आयपीएल स्पर्धेतील उर्वरित सामने घेतले जाऊ शकतात.
बीसीसीआयसाठी IPL स्पर्धा पार पाडण्यासाठी नवा पर्याय, पण..
भारत-पाक यांच्यातील तणावपूर्ण परिस्थितीनंतर पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना सुरु झाल्यावर थांबवण्यात आला होता. त्यानंतर स्पर्धा आठवड्याभरासाठी स्थगित झाल्याची माहिती देण्यात आली. देशातील परिस्थितीचा आढावा घेऊन उर्वरित सामन्यांचे सुधारित वेळापत्रक जाहिर करण्यात येईल, असे बीसीसीआयचे सचिन देवजित सैकिया यांनी निवेदनात म्हटले होते. आयपीएलमधील उर्वरित सामने भारतातच खेळवण्यासाठी बीसीसीआय प्रयत्नशील असल्याचीही चर्चा सध्या क्रिकेट वर्तुळात रंगत आहे. यंदाच्या आयपीएल हंगामातील उर्वरित सामन्यांसाठी कोलकाता, चेन्नई, हैदराबाद आणि बंगळुरु या शहरांचा प्रामुख्याने विचार सुरु असल्याचेही बोलले जाते. यातून बीसीसीआय फायनली कोणता पर्याय निवडणार ते पाहण्याजोगे असेल.