Dwarkanath Sanzgiri Death: ज्येष्ठ अन् सर्वश्रेष्ठ क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले. क्रिकेटची मॅच असो वा एखाद्या खेळाडूचं वर्णन. आपल्या खास लिखाण शैलीतून ते खेळ आणि खेळाडू साक्षात डोळ्यासमोर उभे करायचे. त्यांच्या निधनामुळे मराठी क्रीडा क्षेत्रात एक मोठी अन् न भरून येणारी पोकळी निर्माण झालीये, अशा आशयाच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत. इंग्रजी समालोचक आणि क्रिकेट समीक्षक हर्षा भोगले यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक खास पोस्ट शेअर करत जवळचा मित्र गमावल्याचे दु:ख व्यक्त केले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
हर्षा भोगलेंनी व्यक्त केलं दु:ख
हर्षा भोगले यांनी एक्स अकाउंटवरुन एक ट्विट केले आहे. त्यात त्यांनी लिहिलंय की, "द्वारकानाथ संझगिरी यांच्या निधनाचे वृत्त ऐकून खूप दुःख झाले. ३८ वर्षांपासूनचा मित्र. अनेक आठवणी सुंदर शैलीत रंगवणारा व्यक्ती. तो जे लिहायचा ते प्रसंग डोळ्यासमोर उभे करायचा." अशा शब्दांत आपल्या मित्राच्या खास लिखाण शैलीची खासियत सांगत हर्षा भोगले यांनी क्रीडा समीक्षक द्वारकानाथ संझगिरींना श्रद्धांजली वाहिली आहे. कर्करोगाचा सामना करतानाही ते लिहायचे थांबले नाहीत, असा उल्लेखही हर्षा भोगले यांनी केला आहे.
आजाराचा सामना करत असतानाही लिखाणाकडे फिरवली नाही पाठ
मागील काही वर्षांपासून द्वारकानाथ संझगिरी कर्करोगाचा सामना करत होते. या परिस्थितीतही त्यांनी क्रिकेटवरील लिखाण करणं सोडले नव्हते. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेदरम्यानही त्यांचे समीक्षण पाहायला मिळाले होते. पण त्यानंतर त्यांची प्रकृती खालावली. त्यांना उपचारासाठी लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शब्दांच्या खेळातील महारथी असलेल्या द्वारकानाथ संझगिरींनी क्रिकेटसह बॉलिवूडमधील रंजक किस्सेही मंत्रमुग्ध करून सोडणारे असायचे.