आयपीएलचा थरार सुरू असताना भारतीय नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने मोठी कारवाई केली आहे. बीसीसीआयने मुंबई टी२० लीगच्या संघाचे माजी सहमालक गुरमीत सिंग भामराह यांच्यावर आजीवन बंदी घातली. त्यांच्यावर मॅच फिक्सिंगचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत एनएनआय वृत्तसंस्थेने माहिती दिली.
हे प्रकरण २०१९ मध्ये खेळल्या गेलेल्या मुंबई टी-20 लीगच्या हंगामातील उपांत्य सामन्याशी संबंधित आहे. गुरमीत यांनी सामना फिक्स करण्यासाठी खेळाडूंशी संपर्क केला. त्यानंतर खेळाडूने संबंधित एजन्सींकडे याबाबत तक्रार केली. याप्रकरणात गुरमीत दोषी आढळल्यानंतर त्यांच्यावर आजीवन बंदी घालण्यात आली, अशी माहिती बीसीसीआयचे लोकपाल न्यायमूर्ती अरूण मिश्रा यांनी दिली. याआधी बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाने गुरमीत यांच्याविरुद्ध चौकशी केली, ज्यात ते दोषी आढळले. त्यानंतर हे प्रकरण लोकपालपर्यंत पोहोचले.
अरुण मिश्रा यांनी म्हटले आहे की, क्रिकेटमधील गैरप्रकार रोखण्यासाठी बीसीसीआय सज्ज आहे. मॅच फिक्सिंगविरुद्ध कठोर कारवाई केली पाहिजे. म्हणूनच गुरमीत यांना कठोर शिक्षा देण्यात आली. दरम्यान, २०१३ मध्ये आयपीएल स्पॉट-फिक्सिंग प्रकरणानंतर बीसीसीआयने लीग क्रिकेटच्या संबंधित मोठा निर्णय घेतला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यात येईल, असाही बीसीसीआयने इशारा दिला.