Fan Fights With Female Police Officer : शनिवारी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना पार पडला. यजमान भारतीय संघाने मोठा विजय मिळवत शेजाऱ्यांना पराभवाची धूळ चारली. वन डे विश्वचषकात भारताने सलग आठव्यांदा पाकिस्तानविरूद्ध विजय मिळवला. कालचा सामना पाहण्यासाठी मैदानात जवळपास सव्वा लाख प्रेक्षक उपस्थित होते. ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांच्या सुरक्षेसाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पण सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओत स्पर्धेला गालबोट लागल्याचे दिसते. कारण नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान महिला पोलीस अधिकारी आणि प्रेक्षक यांच्यात हाणामारी झाली.
महिला पोलीस आणि प्रेक्षकाच्या भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. भांडण कशामुळे झाले हे स्पष्ट झालेले नाही. मात्र, त्या महिला पोलिसाने थप्पड मारताच प्रेक्षकाने देखील हात उगारल्याचे दिसते. महिला पोलीस अधिकाऱ्याने संबंधित प्रेक्षकाला तिथून निघून जाण्यास सांगितले. त्यानंतर महिला पोलीस अधिकाऱ्याने त्याला थप्पड मारली. संतापलेल्या प्रेक्षकाने देखील हात उचलून जशास तसे उत्तर देण्याचा प्रयत्न केला, ज्याचा एक व्हिडीओही व्हायरल होत आहे.
भारताची विजयी हॅटट्रिक
पाकिस्तानी संघाने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना ४२.५ षटकांत सर्वबाद केवळ १९१ धावा केल्या. पाकिस्तानने दिलेल्या १९२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने आक्रमक सुरूवात केली. विश्वचषकात पदार्पण करत असलेल्या शुबमन गिलने काही चांगले फटकार मारले पण त्याला शाहीन आफ्रिदीने जास्त वेळ टिकू दिले नाही. मग कर्णधार रोहित शर्माने पाकिस्तानी गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्याने ६ चौकार आणि ६ षटकार मारून ६३ चेंडूत ८६ धावांची खेळी केली. याशिवाय श्रेयस अय्यरने नाबाद ५३ धावा करून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.
Web Title: During ICC ODI World Cup 2023 match between IND vs PAK at Narendra Modi Stadium women police and a spectator fight, video goes viral
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.