Join us  

"सरांचे कपडे परिधान करून अनेक सामने खेळलो आणि घडलो"

सरांच्या अचानक जाण्याने सर्वांनाच धक्का बसला.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2019 9:53 PM

Open in App

- रोहित नाईकमुंबई : सरांच्या अचानक जाण्याने सर्वांनाच धक्का बसला. ही क्रिकेटविश्वासाठी अत्यंत दु:खाची बाब असून आज आम्ही जे काही यश मिळवले ते आचरेकर सरांमुळेच. माझ्या उमेदीच्या काळात आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने कपडे घेण्याचीही माझी ऐपत नव्हती. अशावेळी मी आचरेकर सरांचे कपडे घालून अनेक सामने खेळलो. त्यांचे योगदान मी कधीही विसरू शकणार नाही, अशी भावनिक प्रतिक्रिया रोहित शर्माचे प्रशिक्षक आणि रमाकांत आचरेकर यांचे शिष्य दिनेश लाड यांनी लोकमतकडे दिली.ज्याप्रमाणे आचरेकर-सचिन ही गुरुशिष्यांची जोडी प्रसिद्ध झाली, त्याचप्रमाणे २००७ सालापासून दिनेश लाड-रोहित शर्मा ही जोडीही प्रसिद्ध झाली. मात्र लाडदेखील आचरेकर यांच्या तालमीत घडले असल्याने त्यांचाच वारसा भारतीय क्रिकेटमध्येही आजही सुरू आहे. आचरेकर यांची आठवण सांगताना लाड म्हणाले की, ज्यावेळी मी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली, तेव्हा माझी स्वत:चे कपडे घेण्याची ऐपतही नव्हती. मी क्रिकेटचा गणवेश न घालता इतर कपडे परिधान करून खेळायचो. ही बाब सरांच्या लक्षात आल्यानंतर त्यांना माझी अडचण कळाली. तेव्हा सरांनी कोणताही विचार न करता त्यांनी थेट त्यांचे क्रिकेटचे कपडे मला वापरायला दिले होते. अनेक सामने मी त्यांचे कपडे परिधान करून खेळलो आहे. माझ्यामते त्यांचे कपडे परिधान करून खेळण्याचे भाग्य खूप कमी शिष्यांना लाभले आणि त्यातील एक भाग्यवंत मी आहे, याचा मला अभिमान आहे.आचरेकर यांनी आर्थिक परिस्थिती पाहून क्रिकेट प्रशिक्षण कधीही दिले नाही, असे सांगताना लाड म्हणाले की, माझ्या लहानपणी क्रिकेट फी असा कोणताही प्रकार मला माहितच नव्हतं. याचे कारण म्हणजे, माझ्यासारख्या स्वत:चे कपडे घेण्याइतपत पैसे नसणारा मुलगा क्रिकेटची फी काय भरणार, याची कल्पना सरांना होती. त्यामुळे त्यांनी अनेकांना मोफत प्रशिक्षण दिले. त्यांनी माझ्यासारख्या गरीब मुलांकडून कधीही फीची मागणी केली नाही किंवा पैसे नाही म्हणून आमचा खेळही थांबवला नाही. उलट आम्हाला आवश्यक असलेल्या वस्तू त्यांनी पुरवल्या आणि शिकवलं.बोरिवली येथील स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलचे क्रिकेट प्रशिक्षक असलेले लाड कोणतेही मानधन न घेता नवोदितांना क्रिकेटचे धडे देतात. त्यामुळे सरांनी दिलेली शिकवण मी पुढच्या पिढीपर्यंत पोहचवत असल्याचे ते अभिमानाने सांगतात. लाड यांनी याविषयी म्हटले की, सरांचा वारसा पुढे घेऊन मी आज नवोदितांना मोफत क्रिकेट शिकवत आहे. कारण माझ्या सरांनी मला हेच शिकवलं आहे. सरांच्या मदतीमुळेच मी क्रिकेट खेळण्याचे स्वप्न पूर्ण करू शकलो आणि आज अनेक शिष्य माझ्या हातून घडत आहेत ते सरांमुळेच. सरांनी कायम आमच्यातील गुणवत्ता पाहिली आणि ते गुणवत्ता असलेल्या मुलांनाच मदत करायचे. मी देखील त्यांचा हाच गुण जोपासून प्रशिक्षक म्हणून वाटचाल करत आहे.-----------------------खरं म्हणजे माझं नशीब खूप मोठ होतं म्हणून मला सरांचा सहवास लाभला. गरीब खेळाडूंसाठी त्यांनी खूपच मदत केली. त्यांच्यासाठी सर चालते-फिरते विद्यापीठ होते, असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. त्यांच्या प्रत्येक शिष्याने क्रिकेटविश्वात मोठे नाव कमावून आचरेकर सरांना योग्य गुरुदक्षिणा दिली आहे.- दिनेश लाड

टॅग्स :रमाकांत आचरेकर