चेन्नई : प्रदीर्घ कालावधीपासून राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्याचे स्वप्न बघत होतो, पण भारतीय कसोटी संघात स्थान मिळणे माझ्यासाठी आश्चर्यचकित करणारे आहे, अशी प्रतिक्रिया तमिळनाडूचा अष्टपैलू विजय शंकरने व्यक्त केली.
वेगवान गोलंदाज हार्दिक पांड्याचा बॅकअप मानल्या जाणा-या शंकरला श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जात असलेल्या कसोटी मालिकेत भुवनेश्वर कुमारचा पर्याय म्हणून संघात स्थान देण्यात आले. शंकर म्हणाला, ‘‘मी उत्साहित आहे. भारतीय संघात स्थान मिळवण्याचे स्वप्न मी प्रदीर्घ कालावधीपासून बघितले आहे. ते स्वप्न अखेर साकार झाले. माझ्या मेहनतीचे चीज झाले. मला याची अपेक्षा नव्हती, पण मला चांगले वाटत आहे. पहिल्यांदा भारतीय ड्रेसिंग रूममध्ये सहभागी होण्यासाठी आतूर झालो आहे.’’ भारत ‘अ’ संघातर्फे प्रतिनिधित्व करणाºया २६ वर्षीय शंकरने अष्टपैलू म्हणून परिपक्व होण्यासाठी ‘अ’ संघामुळे मदत मिळाल्याचे म्हटले आहे.
शंकर म्हणाला, ‘‘भारत अ संघासह खेळताना अष्टपैलू म्हणून कामगिरी सुधारण्यासाठी मदत मिळाली. खेळाडू म्हणून परिपक्व होता आले असून वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये खेळण्याची कला आत्मसात करता आली.’’ शंकरने रणजी ट्रॉफीमध्ये ओडिशाविरुद्ध शतकी खेळी केली आणि मोठ्या स्पेलमध्ये गोलंदाजीही केली. (वृत्तसंस्था)
> मी माझ्या फलंदाजीतील फॉर्ममुळे खूश आहे. मी चांगली गोलंदाजी करीत असून मुंबईविरुद्ध चार बळी घेतल्यामुळे माझा आत्मविश्वास उंचावला. फिटनेसवर बरीच मेहनत घेतली आहे. मी एनसीएमध्ये फिजिओ व ट्रेनरसह रिहॅबिलिटेशनमध्ये सहभागी झालो होतो.
- विजय शंकर