आयपीएल २०२५ दरम्यान नोटबूक सेलिब्रेशनमुळे प्रकाश झोतात आलेला लखनौ सुपर जायंट्सचा गोलंदाज दिग्वेश राठी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. दिल्ली प्रीमियर लीगमध्ये साउथ दिल्ली सुपरस्टार्सकडून खेळताना दिग्वेश राठीने वेस्ट दिल्ली लायन्सचा फलंदाज अंकित कुमारशी गैरवर्तन केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. त्याच्या आक्रमक प्रवृत्तीमुळे त्याला बीसीसीआयने अनेकदा त्याला दंड ठोठावला आहे. मात्र, तरीही त्याच्या काहीच बदल झाला नाही.
साउथ दिल्ली लायन्स आणि दिल्ली सुपरस्टार यांच्यात ५ ऑगस्ट रोजी सामना झाला. वेस्ट दिल्ली लायन्सच्या डावात पाचव्या षटकात दिग्वेश राठी गोलंदाजी करत होता. या षटकातील शेवटच्या चेंडूवर तो चेंडू टाकण्यासाठी त्याचा रन-अप पूर्ण करतो पण चेंडू टाकत नाही. त्यानंतर तो चेंडू टाकण्यासाठी विकेट राउंड द विकेट येतो. यावेळी फलंदाजी करणारा अंकित त्याच्या क्रीजवरून दूर जातो. त्यावेळी दिग्वेश राठी हा अंकित कुमारशी वाद घालतो. हा वाद इतका वाढला की, मैदानातील पंचाना मध्यस्ती करावी लागली. त्यानंतर अंकितने दिग्वेश राठीच्या स्पेलच्या तिसऱ्या षटकात दोन गगनचुंबी षटकार मारले आणि त्याला दोन बोट दाखवले.
या सामन्यात राठीने तीन षटकात एकूण ३३ धावा दिल्या आणि त्याला एकही विकेट मिळाली नाही. तर, अंकितने ४६ चेंडूत ११ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने ९६ धावांची शानदार खेळी केली. वेस्ट दिल्ली लायन्सने हा सामना ८ विकेट्सने जिंकला. याआधीही आयपीएल २०२५ मध्ये त्याने सनरायझर्स हैदराबादचा फलंदाज अभिषेक शर्मा वाद घातला होता. त्यामुळे त्याला एका सामन्यासाठी निलंबित करण्यात आले. मात्र, तरीही त्याने आक्रमक प्रवृत्ती सुरुच ठेवली. त्यासाठी त्याला अनेकदा दंड ठोठावण्यात आला.