Join us

काही विचारू नका, चार दिवस झोपणार फक्त! भारताला हरविल्यानंतर पहिली प्रतिक्रिया...

अगदी अलीकडेच पाकिस्तानातून मार खाऊन परत येताना स्टोक्स पराकोटीचा पराभूत झालेला होता. ग्रेट ऑल राउंडर म्हणून असलेला त्याचा किताबच व्यर्थ आहे, त्याला हाकला इथवरची चर्चा त्यानं ऐकली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 07:42 IST

Open in App

बेन स्टोक्स नावाच्या इंग्लंडच्या कप्तानाचा खरं तर तमाम भारतीयांना रागच यायला हवा; पण अटीतटीचा सामना हरल्यावरही त्याच्याविषयी आदरच वाटतो आहे. त्याचं कारण, सामना जिंकल्यानंतरचं त्याचं वर्तन. त्यानं काही क्षणांचं सेलिब्रेशन संपवत तातडीने जडेजा आणि सिराजला कडकडून मिठी मारली. त्यांची वेदना जाणवण्याइतपत त्याचं भान यशाच्या त्या अद्भुत क्षणीही जागंच होतं! आणि का नसावं? असे सामने त्यानंही गमावलेच आहेत. अगदी अलीकडेच पाकिस्तानातून मार खाऊन परत येताना स्टोक्स पराकोटीचा पराभूत झालेला होता. ग्रेट ऑल राउंडर म्हणून असलेला त्याचा किताबच व्यर्थ आहे, त्याला हाकला इथवरची चर्चा त्यानं ऐकली. त्याच काळात तो स्वत:शीही झगडत होता. एका मुलाखतीत त्यानं गेल्या वर्षी सांगितलं होतं, ‘आय फेल्ट दॅट आय वॉज हॅविंग १० डिफरंट व्हर्जन ऑफ मायसेल्फ!’ 

बेन स्टोक्स तसा अत्यंत इमोशनल. एकेकाळी त्याचे वडील न्यूझीलंड सोडून इंग्लंडला स्थायिक व्हायला आले तेव्हा तो जेमतेम १२ वर्षांचा होता. या मुलाला क्रिकेटचा नाद लागला आणि तो इंग्लंडचा क्रिकेट कप्तान हाेण्यापर्यंत पोहोचला. पण मानसिकदृष्ट्या कणखर होणं हे त्याच्यासमोरही आव्हान होतंच. तो सांगतो, ‘सर्व परिस्थितीत मी एकसारखाच वागलो तर ना रिझल्ट वेगळे येतात, ना गुणवत्तेला न्याय मिळतो. मग जी माझी कच्ची बाजू वाटत होती तीच मी वैद्यकीय मदतीने माझी सर्वांत मोठी ताकद म्हणून स्वीकारत गेलो. माझीच अनेक रूपं. प्रत्येक परिस्थितीला मी वेगळी प्रतिक्रिया देऊ लागलो. ज्याक्षणी जे आवश्यक ते पूर्ण ताकदीने करत गेलो. नाऊ आय ॲम, व्हाॅट आय ॲम! आता मी जसा आहे तो इतरांनी स्वीकारो किंवा नावं ठेवोत, मला फरक नाही पडत!’ त्यानं भारताविरुद्ध शेवटच्या टप्प्यात ४४ षटकं टाकली. मॅच फिरवली. तो म्हणालाच, ‘नथिंग वाज स्टॉपिंग मी! दमलो, आता मात्र तीन-चार दिवस फक्त झोपणार आहे!’      - अनन्या भारद्वाज, मुक्त पत्रकार

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडबेन स्टोक्स