Amanjot Kaur On Her Grandmother Health : अमनजोत कौर हिने सर्वोत्तम क्षेत्ररक्षणाचा नजराणा पेश करत भारतीय महिला संघाला विश्वविजेता करण्यात मोलाची भूमिका बजावली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात रॉकेट थ्रोसह आधी तिने संघाला पहिली विकेट मिळवून दिली. एवढेच नाही तर डोकेदुखी ठरत असलेल्या दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वॉल्व्हार्ड हिचा उत्तम झेल टिपत भातीय संघाच्या विजयातील मोठा अडथळा तिने दूर केला होता.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अमनजोतची कमालीची फिल्डिंग अन्...
महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनलमधील विजयानंतर तिच्या फिल्डिंगचं कौतुक होत असताना तिच्या आजीच्या तब्येतीवरून उलट सुलट चर्चा रंगण्यास सुरुवात झाली. यावर अमनजोत कौर हिने मौन सोडले आहे. नात वर्ल्ड कप स्पर्धेत खेळत असताना आजीला रुग्णालयात नेण्याची वेळ आली ही गोष्ट खरी असली तरी त्यानंतर सोशल मीडियावर ज्या गोष्टी पसरवण्यात आल्या त्या खोट्या असल्याची अमनजोत कौरनं सांगितले आहे.
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
अमनजोत कौरनं आजीसंदर्भात शेअर केली खास पोस्ट, म्हणाली...
Amanjot Kaur On Her Grandmother Health
स्टार महिला ऑलराउंडरने आपल्या इन्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून आजीसंदर्भातील खरी गोष्ट काय ते शेअर केले आहे. अमनजोत कौरनं इन्स्टा स्टोरीच्या माध्यमातून आजीचा एक फोटो शेअर करत लिहिलंय की, मला फक्त एवढेच सांगायचं आहे की, माझी आजी ठणठणीत आहे. तिची तब्येत अगदी उत्तम आहे. कृपया ऑनलाईनच्या माध्यमातून पसरणाऱ्या खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका, तसेच खोटी बातमी पुढे पसरवू नका, अशी विनंती तिने केली आहे. कुटुंबियांबद्दल काळजी दाखवल्याबद्दल तिने सर्वांचे आभारही मानले आहेत.
घरच्यांनी अमनजोत कौरपासून लपवली होती गोष्ट
भारतीय संघाच्या ऐतिहासिक विजयानंतर अमनजोत कौरचे वडील भूपेंदर सिंग यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत लेक वर्ल्ड कप स्पर्धेत खेळत असताना कुटुंबियात वैद्यकीय समस्या उद्भवल्याची गोष्ट सांगितली होती. अमनजोतच्या आजीला ह्रदयविकाराचा झटका आला होता. उपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल केले. पण आम्ही अमनजोत कौरला ही गोष्ट कळवली नाही. खेळावरुन लक्षविचलित होऊ नये, यासाठी आम्ही तिच्यापासून हे लपवलं. असे ते म्हणाले होते. नातीच्या मैदानातील कामगिरीबद्दल आईल अपडेट देतो, असेही ते म्हणाले होते. त्यांच्या या मुलाखतीनंतर अमनजोतच्या आजीच्या निधनाची खोटी बातमी पसरल्याचे पाहायला मिळाले. क्रिकेटरच्या पोस्टमुळे यात कोणतेही तथ्य नाही ते स्पष्ट झाले आहे.