मुंबई: 'मुंबई क्रिकेटचे भारतीय क्रिकेटमधील योगदान मोलाचे आहे. मी बीसीसीआयमध्ये प्रशासक म्हणून जे काही योगदान देऊ शकलो, ते मुंबई क्रिकेटमुळे शक्य झाले. माझी विनंती आहे की, दिग्गज क्रिकेटपटू अजित वाडेकर यांना विसरू नका. त्यांचे योगदान मोलाचे असून, वानखेडे स्टेडियममध्ये कुठे तरी त्यांचे नाव दिले गेले पाहिजे', असे आवाहन अनुभवी क्रिकेट प्रशासक प्रा. रत्नाकर शेट्टी यांनी मुंबई क्रिकेट संघटनेला (एमसीए) केले.
गुरुवारी बीकेसी येथील एमसीए अकादमीच्या मैदानात 'एमसीए'चा वार्षिक पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी २०२२-२३ आणि २०२३-२४ अशा दोन सत्रांतील पुरस्कार वितरण करण्यात आले. यावेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक, माजी अध्यक्ष आशिष शेलार आणि एमसीएचे इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
'एमसीए'ने शेट्टी आणि माजी दिग्गज क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांचा २०२२-२३ या सत्रासाठी, तर माजी दिग्गज क्रिकेटपटू डायना एडुल्जी आणि ज्येष्ठ क्रिकेट प्रशासक प्रवीण बर्वे यांचा २०२३-२४ या सत्रासाठी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते 'जीवनगौरव पुरस्कार' देऊन सन्मान केला. वैयक्तिक कारणामुळे मुंबई बाहेर असलेले वेंगसरकर उपस्थित राहू शकले नाहीत. देशांतर्गत स्पर्धामध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनाही 'एमसीए'ने गौरविले. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात २०२३-२४च्या सत्रात रणजी करंडक पटकावलेल्या मुंबई संघासह राष्ट्रीय महिला अजिंक्यपद स्पर्धेतील विजेत्या मुंबई संघालाही सन्मानित करण्यात आले.
मुंबई क्रिकेटमध्ये दिवंगत क्रिकेटपटू पद्माकर शिवलकर यांचे अमूल्य योगदान आहे. 'एमसीए'ने त्यांच्या कुटुंबियांना सन्मानित केले, हे कौतुकास्पद आहे. आजच्या आयपीएलप्रमाणे, त्या काळी खेळाडूंना फारसे आर्थिक पाठबळ नव्हते. शिवाय शिवलकर यांना भारतीय संघातून खेळण्याची संधीही मिळाली नाही. मात्र, तरीही त्यांनी मुंबई क्रिकेटची अविरत सेवा केली. भारतीय संघ आज क्रिकेटविश्वावर वर्चस्व गाजवत असून, यामध्ये मुंबई क्रिकेटची भूमिका मोलाची आहे.
-सी. पी. राधाकृष्णन, राज्यपाल
यांचा विशेष सन्मान
दिवंगत फिरकीपटू पद्माकर शिवलकर यांच्या कुटुंबियांचा राज्यपालांच्या हस्ते विशेष सन्मान झाला. काही दिवसांपूर्वीच, ३ मार्च रोजी वयाच्या ८४व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलेल्या शिवलकर यांनी वयाच्या पन्नाशीमध्येही प्रथमश्रेणी क्रिकेट खेळत एकूण १२४ सामन्यांत ५८९ बळी घेतले. त्याचप्रमाणे मुंबईच्या मैदान क्रिकेटमध्ये भरीव योगदान देऊन तळागाळातील गुणवत्ता शोधणारे गोपाळ कोळी आणि मधुकर मोहोळ यांचाही 'एमसीए'ने विशेष सत्कार केला.
Web Title: Do not forget Ajit Wadekar invaluable contribution to cricket said Ratnakar Shetty
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.