Join us  

आत्महत्या करणार होता दिनेश कार्तिक, आता ‘मॅचविनर’ ठरतोय; चित्रपटातील कथानकासारखे आयुष्य पालटले

सर्वांत जवळचा मित्र आणि पहिली पत्नी या दोघांकडून विश्वासघात होताच कार्तिक आयुष्य संपविण्याच्या निर्णयापर्यंत आला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 10:18 AM

Open in App

बेंगळुरू : आयपीएल २०२२ मध्ये आरसीबीचा अनुभवी यष्टिरक्षक-फलंदाज कमालीचा फॉर्ममध्ये आहे. ३६ वर्षांचा कार्तिक यंदा युवा खेळाडूंना लाजविणारी कामगिरी करीत एकट्याच्या बळावर सामना खेचून आणत आहे. निवृत्तीच्य वयात कार्तिकची धडाकेबाज कामगिरी पाहून सारेच हैराण आहेत. कामगिरीचे हे शिखर गाठणे कार्तिकसाठी सोपे नव्हते.

सर्वांत जवळचा मित्र आणि पहिली पत्नी या दोघांकडून विश्वासघात होताच कार्तिक आयुष्य संपविण्याच्या निर्णयापर्यंत आला होता. आत्महत्येचा विचार त्याच्या मनात आला. या धडाकेबाज खेळाडूच्या आयुष्यातील घडामोडी चित्रपटातील कथानकाइतक्याच रंजक आहेत.

 २००७ ला दिनेशचे बालपणची मैत्रीण निकिता वंजारासोबत लग्न झाले. या काळात भारतीय संघातून धोनीने विश्रांती घेताच कार्तिक यष्टीमागे दिसायचा. स्थानिक सामन्यात तामिळनाडू संघाचा तो कर्णधार होता. दुसरीकडे मुरली विजय आणि निकिता यांचे अफेअर सुरू होते. निकिता मुरलीच्या बाळाला जन्म देणार ही गोष्ट दिनेशचा अपवाद वगळता तामिळनाडू संघातील सर्व सहकाऱ्यांना माहिती होती. अचानक एक दिवस निकिताने कार्तिककडे या गोष्टीचा खुलासा करीत घटस्फोटाची मागणी केली. २०१२ला निकिताने घटस्फोट घेत मुरलीसोबत विवाह केला.

डिप्रेशनमुळे बनला देवदास -मुरली विजय आयपीएलमध्ये सीएसकेसाठी सातत्याने धावा काढत होता. कार्तिकची कामगिरी मात्र खराब होत असल्याने त्याला संघाबाहेरचा रस्ता दाखविण्यात आला. पुढे तामिळनाडू संघाचे नेतृत्व काढून घेत ते मुरलीकडे सोपविण्यात आले. कार्तिक डिप्रेशनमध्ये गेला. तो आत्महत्येबाबत वारंवार विचार करू लागला. सराव आणि जिमदेखील सोडले. ट्रेनरला चिंता वाटू लागल्याने ते दिनेशच्या घरी गेले. कार्तिक हा देवदाससारखा दाढी वाढवून एका कोपऱ्यात बसलेला दिसला. ट्रेनरने त्याला जिममध्ये जाण्याचा सल्ला दिला. हा सल्ला अंमलात आणणाऱ्या कार्तिकची जिममध्येच पहिली भेट दीपिका पल्लिकलसोबत झाली होती. 

दीपिकामुळे आयुष्य बदलले -कार्तिक- दीपिका यांच्या मैत्रीला बहर आला. कार्तिक नेट्सवर चांगला सराव करू लागला. स्थानिक सामन्यात त्याने धावा काढल्या.  २०१५ ला दोघांचा विवाह झाला.  तो भारतीय संघात आला, शिवाय आयपीएलमध्ये केकेआरचा कर्णधारदेखील बनला. ३४ व्या वर्षी आयपीएलचे नेतृत्व गमावताच तो निवृत्तीच्या विचारात होता. याच काळात दीपिका गर्भवती राहिली. २०२१ दीपिकाने जुळ्यांना जन्म दिला. कार्तिकने क्रिकेट सोडून समालोचनावर लक्ष केंद्रित केले. येथेही तो प्रभावी ठरला.

चेन्नईच्या सर्वात उच्चभ्रू वस्तीत घर घेण्याचे कार्तिकचे स्वप्न होते; पण किमती आकाशाला भिडणाऱ्या होत्या. दीपिकाने कार्तिककडे एक प्रस्ताव ठेवला. दोघांनीही खेळायचे आणि पैसा कमवायचा, असा तो प्रस्ताव होता. दीपिकाने स्क्वॅशमध्ये नाव कमावले तर कार्तिकने क्रिकेटवर फोकस केले.  काही महिन्यांत पोएस गार्डन या पॉश एरियात घर घेण्याचे या दाम्पत्याचे स्वप्न साकार झाले. २०२२ च्या आयपीएल आधी सीएसकेने संघात येण्याचा कार्तिकला प्रस्ताव दिला. लिलावात सीएसके कार्तिकवर बोली लावत असताना आरसीबीने बाजी मारली. कार्तिकला साडेपाच कोटी मिळाले. आता यंदा ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी कार्तिकला भारतीय संघात स्थान देण्याची मागणी होऊ लागली आहे.

टॅग्स :दिनेश कार्तिकभारतीय क्रिकेट संघआयपीएल २०२२
Open in App