Join us

Rohit Sharma: रोहितच्या कॅप्टन्सीवर दिनेश कार्तिकचे सूचक विधान; म्हणाला, “वर्ल्ड कपमध्ये चांगली कामगिरी...”

Rohit Sharma: दिनेश कार्तिकने रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्याच्या कॅप्टन्सीवर सूचक शब्दांत भाष्य केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2023 16:31 IST

Open in App

Rohit Sharma: न्यूझीलँडच्या संघाला एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत व्हाइट व्हॉश दिल्यानंतर टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. एकदिवसीय मालिकेसाठी रोहित शर्मा भारतीय संघाचा कर्णधार होता. तर टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात हार्दिक पंड्या कर्णधार होता. भारताच्या झालेल्या या पराभवानंतर प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. यातच भारताचा यष्टिरक्षक आणि आघाडीचा फलंदाज दिनेश कार्तिक याने रोहित शर्माच्या कर्णधारपदाबाबत सूचक विधान केले आहे. 

एकदिवसीय आणि टी-२० फॉरमॅटमध्ये भारताचे नेतृत्व वेगवेगळ्या कर्णधारांनी केले आहे. अशातच भारतीय संघ आगामी काळातही वेगवेगळ्या कर्णधारांच्या नेतृत्वाखाली पद्धतीने खेळणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावरही दिनेश कार्तिकने मत मांडले आहे. वेगळ्या फॉरमॅटसाठी वेगळा कर्णधार ही रणनीति यशस्वी होते का, हे आगामी एकदिवसीय विश्वचषकानंतर समजेल, असे दिनेश कार्तिकने म्हटले आहे. 

एकदिवसीय विश्वचषकापर्यंत भारतीय संघाला टी-२० सामने अधिक खेळायचेत

एकदिवसीय विश्वचषकापर्यंत भारतीय संघाला बहुतेक टी-२० सामने खेळायचे आहेत. आयपीएलनंतर वेस्ट इंडिजची मालिका आहे. यानंतर वेगळ्या फॉरमॅटसाठी वेगळा कर्णधार असावा का, याचे चित्र अधिक स्पष्टपणे दिसू लागेल. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली संघ विशेष कामगिरी करू शकला नाही. तर सदर रणनीतिप्रमाणे जाता येऊ शकेल. एकदिवसीय विश्वचषकात रोहित शर्माने अप्रतिम कामगिरी केली तर कदाचित आता २०२४ चा टी-२० विश्वचषकही त्याच्या नेतृत्वाखाली खेळवला जाऊ शकतो, असे दिनेश कार्तिकने नमूद केले. 

दरम्यान, हार्दिक पांड्याने भारतीय संघाचे उत्तम नेतृत्व केले आहे. या सामन्याव्यतिरिक्त अन्य सामने भारतीय संघाने यापूर्वी जिंकले आहेत. विराट कोहलीनंतर हार्दिक पंड्या हा असा एक खेळाडू आहे, ज्याला मोठ्या खेळात अधिक चांगली कामगिरी करताना तुम्ही पाहू शकता, असे दिनेश कार्तिकने म्हटले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :दिनेश कार्तिकरोहित शर्माहार्दिक पांड्या
Open in App