Join us  

सर्वोत्तम डेथ बॉलर कोण? बुमराह नाहीतर कार्तिकनं दिली पाकिस्तानी गोलंदाजाला पसंती

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यॉर्कर स्पेशालिस्ट म्हणून ओळखला जातो.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2023 4:38 PM

Open in App

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यॉर्कर स्पेशालिस्ट म्हणून ओळखला जातो. आपल्यी गतीने फलंदाजांना गारद करणारा बुमराह मोठ्या कालावधीपासून क्रिकेटपासून दूर आहे. पण, आयर्लंडविरूद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेतून बुमराह पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. पाकिस्तानी संघात देखील वेगवान गोलंदाजांची मोठी फळी आहे. यातीलच एक नाव म्हणजे हारिस रौफ. रौफने फार कमी वेळात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली छाप पाडली आहे. तीन वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या रौफने पाकिस्तानकडून ६२ ट्वेंटी-२० सामन्यांमध्ये ८३ बळी घेतले आहेत. 

कार्तिकला हारिस रौफची भुरळ दरम्यान, हारिस रौफ सध्या इंग्लंडमध्ये द हंड्रेड लीग खेळत आहे, जिथे त्याने घातक गोलंदाजीने कहर माजवला. भारताचा यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकही या पाकिस्तानी गोलंदाजाचा चाहता झाला असून त्याने डेथ ओव्हर्समध्ये जगातील सर्वोत्तम गोलंदाज म्हणून रौफला पसंती दिली आहे. दिनेश कार्तिकने स्काय स्पोर्ट्सशी संवाद साधताना सांगितले की, हारिस रौफ हा वन डे आणि ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जगातील सर्वोत्तम डेथ ओव्हर्स स्पेशालिस्ट गोलंदाज आहे. काही वर्षांपूर्वी तो टेनिस बॉल क्रिकेट खेळायचा. नंतर पाकिस्तान सुपर लीगमध्ये लाहोर कलंदर्सच्या संघात आणि आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इतकी चांगली कामगिरी करणे ही मोठी गोष्ट आहे.

खरं तर मागील वर्षी पार पडलेल्या ट्वेंटी-२० विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यादरम्यान, विराट कोहलीने हारिस रौफला २ चेंडूवर दोन षटकार ठोकले अन् पाकिस्तानी खेळाडू प्रसिद्धीच्या झोतात आला. गोळीसारखा वेग असलेला हारिसचा चेंडू मैदानाबाहेर लावून विराटने पाकिस्तानच्या तोंडचा घास पळवून भारताला विजय मिळवून दिला होता. तेव्हापासून रौफला खऱ्या अर्थाने जग ओळखू लागले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

वेग अन् हारिस रौफ २०२० मध्ये हारिस रौफने पाकिस्तानी संघाकडून ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने पाकिस्तानसाठी एक कसोटी, २२ वन डे आणि ६२ ट्वेंटी-२० सामने खेळले आहेत, ज्यात त्याने एकूण १२३ बळी घेतले आहेत. तो त्याच्या वेगवान गोलंदाजीसाठीही ओळखला जातो. त्याने इंग्लंडविरुद्ध ताशी १५९ किलोमीटर वेगाने चेंडू टाकला होता. पाकिस्तान सुपर लीगमध्येही त्याने १५४ किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकला आहे, जो या स्पर्धेतील दुसरा सर्वात वेगवान चेंडू ठरला आहे. 

टॅग्स :दिनेश कार्तिकपाकिस्तानभारतीय क्रिकेट संघ
Open in App