Indian Cricketer Dinesh Karthik Welcome Baby Girl : टीम इंडियाचा माजी विकेट किपर बॅटर दिनेश कार्तिक दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. त्याची पत्नी स्कॉश क्वीन दीपिका पल्लीकल हिने मुलीला जन्म दिला आहे. या जोडीचं हे तिसरे अपत्य आहे. अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटच्या माध्यमातून एक खास पोस्ट शेअर करत क्रिकेटरनं चाहत्यांसोबत गूडन्यूज शेअर केली आहे.
आधी जुळ्या मुलांचे आई-बाबा, आता घरी अवरतली परी!
याआधी २८ ऑक्टोबर २०२१ मध्ये दिनेश कार्तिक-दीपिका पहिल्यांदा आई बाबा झाले होते. त्यावेळी दीपिकानं दोन जुळ्या मुलांना जन्म दिला होता. कबीर आणि जियान आपल्या बहिणीच्या भेटीसाठी उत्सुक आहेत, असा उल्लेख करत आपल्या दिनेश कार्तिकनं लेकीचं नाव राहा ठेवल्याची गोष्टीही शेअर केली आहे.
दिनेश कार्तिकनं खास पोस्ट शेअर करत दिली माहिती
दिनेश कार्तिकने दीपिकाला टॅग करत एक टेक्स्ट इमेज शेअर केली आहे. यात लिहिलं आहे की, "आमच्या हृदयात आशीर्वादाची भावना आणि शब्दांत व्यक्त करता न येणारी कृतज्ञता घेऊन आम्ही आमच्या लाडक्या लेकीचं या जगात स्वागत करतो. कबीर आणि जियान आपल्या बहिणीला (राहा पल्लिकल कार्तिक) भेटण्यासाठी खूप उत्सुक आहेत.
प्रेमात मोठा धोका! मग दिनेश कार्तिकच्या आयुष्यात आली दीपिका
दिनेश कार्तिक हा प्रेमाच्या खेळात मोठा धोका मिळाल्यानंतर सावरणारा 'सबसे बडा खिलाडी' आहे. दिनेश कार्तिक याच्या पहिल्या पत्नीचे नाव निकिता वंजारा असं आहे. एखाद्या चित्रपटातील स्क्रिप्ट वाटावी, अशा पद्धतीने ती कार्तिकच्या खास मित्राच्या अर्थात मुरली विजयच्या प्रेमात पडली अन् दिनेश कार्तिकची साथ सोडून तिने आपला नवा संसार थाटला. "दोस्त दोस्त ना रहा...प्यार प्यार ना रहा" या परिस्थितीत असताना दीपिका पल्लीकल क्रिकेटरच्या आयुष्यात आली. दोघांनी २०१५ मध्ये एकमेकांसोबत नव्या आयुष्याची सुरुवात केली.