Digvesh Rathi Virat Kohli Viral Video, IPL 2025: लखनौ सुपर जायंट्सचा फिरकी गोलंदाज दिग्वेश राठी त्याच्या नोटबुक सेलिब्रेशनमुळे अनेकदा चर्चेत असतो. यामुळे त्याला लाखो रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. अलिकडेच त्याच्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली होती. ती बंदी संपवून त्याने पुन्हा एकदा त्याच ऊर्जेने क्रिकेटच्या मैदानात प्रवेश केला. लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्यात तो पुन्हा खेळताना दिसला. सामन्यात त्याला फारशी चमक दाखवता आली नाही. पण विराट कोहली फलंदाजी करत असताना एक मजेशीर किस्सा घडला. त्यानंतर केवळ विराटच नव्हे तर रिषभ पंतही हसू लागला.
दिग्वेशची चाल, विराट-पंतचं हास्य
विराट कोहली आणि दिग्वेश राठी यांच्यातील मजेशीर किस्सा बेंगळुरूच्या डावादरम्यान दिसला. दिग्वेशने चेंडू टाकलाच नाही, ते पाहून पंत आणि कोहली हसायला लागले. कोहली २३ चेंडूत ४८ धावांवर फलंदाजी करत होता आणि चांगल्या लयीत होता. ४ चेंडू खेळल्यानंतर मयंक अग्रवालने कोहलीला स्ट्राईक दिली. राठी पाचवा चेंडू टाकायला गेला, त्याने त्याची अँक्शनही पूर्ण केली पण अचानक चेंडू टाकला नाही. तो पुढे सरकला आणि कोहलीकडे पाहिले, त्यानंतर पंतला फिल्डिंगबद्दल सांगितले. राठी काय म्हणाला ऐकू आले नसले तरी त्याच्या हावभावांवरून असे दिसले की त्याला कोहलीचा प्लॅन आधीच कळला. म्हणून दिग्वेशने चेंडू टाकला नाही. हे पाहून कोहली आणि पंत हसायला लागले. यानंतर, जेव्हा राठीने चेंडू टाकला तेव्हा कोहली फक्त १ धाव घेऊ शकला.
दिग्वेशला एकही विकेट मिळाली नाही
नेहमी विकेटनंतर नोटबूक सेलिब्रेशन करण्यासाठी चर्चेत असलेल्या दिग्वेशला या सामन्यात एकही बळी मिळाला नाही. एका षटकात त्याच्या गोलंदाजीवर जितेश शर्मा बाद झाला, पण तो चेंडू नो-बॉल ठरवण्यात आला. तसेच, दिग्वेशने एकदा नॉन स्ट्राईकवर मंकड रनआऊट करण्याचा प्रयत्न केला, पण कर्णधार पंतने अपील काढून घेतल्याने तेव्हाही नाबाद ठरवण्यात आले.
Web Title: Digvesh Rathi did not bowl Virat Kohli Rishabh Pant smiled video goes viral in IPL 2025 RCB vs LSG
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.