- मतीन खानस्पोर्टस हेड- एव्हीपी लोकमत पत्रसमूह
रोहित शर्माच्या कसोटीतून निवृत्तीच्या घोषणेमुळे अनेक जण आश्चर्यचकित झाले. मला या निर्णयाचे नवल वाटले नाही. रोहितने मेलबोर्न कसोटीत अखेरचा डाव ३० डिसेंबर २०२४ ला खेळला. तो ९ धावा काढून कमिन्सच्या चेंडूवर मार्शकडे झेल देत बाद झाला, त्यावेळी मी स्वत: त्या दिवशी उपस्थित होतो. बाद झाल्यानंतर तो स्वत:वरच नाराज दिसला. पुढची कसोटी २ जानेवारी २०२५ पासून सिडनीत होती. मी सामन्याआधी गौतम गंभीर यांच्या पत्रकार परिषदेत उपस्थित होतो. संघात बऱ्याच हालचाली सुरू होत्या. त्यामुळे पत्रपरिषदेला दोन तास विलंब झाला. त्यावेळी रोहित अनुपस्थित होता. त्याच्याविषयी मोठा निर्णय झाल्याचे जाणवत होते. रोहितबाबत विचारलेल्या प्रश्नांना गंभीर यांनी शिताफीने बगल दिली. दुसऱ्या दिवशी रोहित संघाबाहेर होता. खराब फॉर्ममुळे कसोटी सामन्यातून स्वत:ला बाहेर ठेवण्याचा कर्णधाराने घेतलेला निर्णय याआधी कसोटीत फार कमी वेळा घडला असावा.
सिडनी कसोटीत अंतिम संघातून दूर राहिल्यानंतर ड्रेसिंग रूमबाहेर रोहित शर्मा असा खिन्न बसलेला दिसला होता.
एका युगाची अखेर झालीरोहित संघाबाहेर असताना त्याच्या देहबोलीतून जाणवत होते की, त्याने मनोमन एखादा मोठा निर्णय घेतला असावा. रोहित बाहेर बसल्यानंतरही सिडनी कसोटीत भारत पराभूत झाला. कर्णधाराचे बलिदानही संघासाठी उपयुक्त ठरले नाहीच, उलट इभ्रत गमावल्यासारखी स्थिती झाली. सिडनी कसोटीआधी जी स्थिती उद्भवली, त्यावर रोहित दु:खी होता. त्याने निवृत्ती जाहीर केली, तरी हा निर्णय त्याने सिडनी कसोटीतून बाहेर होत असतानाच घेतला होता.
रोहितचे नेतृत्व व फलंदाजी भारतासाठी सदैव महत्त्वाची ठरली. २०२३ ला ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने नागपूर कसोटीत आक्रमक शतक झळकविले होते. ती खेळी अद्याप आठवते. रोहितने अनेकदा अविस्मरणीय खेळीच्या बळावर भारताला कसोटी विजय मिळवून दिले. धडाकेबाज फलंदाज, चॅम्पियन खेळाडू आणि बेधडक वृत्ती जोपासणाऱ्या कर्णधाराच्या निवृत्तीसह एका युगाची अखेर झाली.