आयपीएल २०२६ च्या ९व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सनेगुजरात टायटन्सचा ६ धावांनी पराभव करत गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले. राजस्थानचा युवा यष्टीरक्षक फलंदाज ध्रुव जुरेल संघाच्या विजयाचा खरा शिल्पकार ठरला. जुरेलने केवळ बॅटनेच नाही, तर यष्टीमागे चपळता दाखवत गुजरातच्या हातून विजय हिरावून घेतला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने २० षटकांत ६ बाद २१० धावांचा डोंगर उभा केला. सलामीवीर यशस्वी जैस्वालने ३६ चेंडूत ५५ धावांची धडाकेबाज सुरुवात करून दिली. मात्र, मधल्या फळीत ध्रुव जुरेलने आक्रमक पवित्रा घेत गुजरातच्या गोलंदाजांची पिसे काढली. जुरेलने अवघ्या ४२ चेंडूत ५ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ७५ धावांची खेळी केली. त्याचा स्ट्राईक रेट १७८.५७ इतका होता.
सामना कुठे पलटला?
२११ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातची सुरुवात चांगली झाली होती. साई सुदर्शनने ७३ धावांची खेळी करत सामना जवळ आणला होता. मात्र, मोक्याच्या क्षणी जुरेलने रवी बिश्नोईच्या गोलंदाजीवर राहुल तेवतियाचा महत्त्वाचा झेल टिपला. सामन्याच्या १५व्या षटकात जेव्हा शाहरुख खान धोकादायक वाटत असताना त्याला जुरेलने धावबाद करून त्याला माघारी धाडले. या दोन विकेट्समुळे गुजरातचा डाव गडगडला.
शेवटच्या ओव्हरचा थरार
गुजरातला शेवटच्या २ षटकांत १५ धावांची गरज होती. जोफ्रा आर्चरने १९व्या षटकात केवळ ४ धावा देऊन सामन्यात रंगत आणली. शेवटच्या षटकात तुषार देशपांडेने टिच्चून गोलंदाजी केली. रशिद खानने शेवटच्या चेंडूवर षटकार मारण्याचा प्रयत्न केला खरा, पण आर्चरने त्याचा झेल टिपला आणि राजस्थानने ६ धावांनी विजय साजरा केला. या विजयासह राजस्थान रॉयल्सने आयपीएल २०२६ च्या हंगामात आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आहे.