अयाझ मेमन
मागच्या आठवड्यात महेंद्रसिंह धोनीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती गाजली. स्वातंत्र्यदिनी त्याने इन्स्टाग्रामवर निवृत्तीची घोषणा करताच जगभरात निवृत्तीच्या चर्चेला आणि अभिष्टचिंतनाला उधाण आले होते.
पतोडी १५ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत केवळ एका डोळ्याने खेळले. ते कमालीचे स्ट्रोकप्लेअर होते. दिग्गज गोलंदाजांना त्यांनी निष्प्रभ ठरवले. याशिवाय शानदार क्षेत्ररक्षक असल्यानेच त्यांना ‘टायगर’ संबोधले जायचे. वयाच्या २१ व्या वर्षी पतोडी कर्णधार बनले. संघात एकोपा निर्माण करण्यात त्यांचा हातखंडा होता. संघाच्या गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात जीव ओतून भारताला पहिल्यांदा विदेशात विजय मिळवून दिला. पतोडींच्या आधी आणि नंतरही विविध डावपेचांसह खेळणारा खेळाडू पाहिला नाही. एक डोळा असलेला खेळाडू कसोटीत असा अद्वितीय ठरतो, हेच वैशिष्ट्यपूर्ण म्हणावे लागेल.
सचिनसारखा खेळाडू क्रिकेट इतिहासात सर्वांत महान फलंदाज बनला. सचिनचे करिअर तर उत्तम पटकथेचे उत्कृष्ट उदाहरण ठरले. सातत्यपूर्ण फलंदाजीच्या बळावर सचिनने शतकांचे शतक साजरे केले. हा एक संस्मरणीय विक्रम ठरावा. एक अब्जाहून अधिक भारतीयांच्या अपेक्षांचे ओझे पेलवून प्रदीर्घ काळ खेळणे हा सचिनच्या करिअरचा मोठा पैलू ठरावा. ब्रॅडमन यांनीदेखील इतका मोठा काळ दडपण झेलले नसावे. धोनीची कारकीर्द जितकी शानदार तितकीच मजेशीर आहे. सुरुवातीला फुटबॉल की क्रिकेट यातून एकाची निवड करण्यात चाचपडणाऱ्या धोनीचे प्राधान्य नोकरी शोधण्यास राहिले. झारखंडसारख्या कमकुवत राज्य संघाचे प्रतिनिधित्व करीत जे मिळवले ते प्रतिष्ठापूर्वक जपलेदेखील. धोनीचे अपारंपरिक तंत्र आणि डावपेच चर्चेचा विषय बनायचे. कधीकधी टिंगलही व्हायची. मैदानावर त्याची उपस्थिती ‘हटके’ असायची. टीकेची तमा आणि अहंकार न बाळगता तो खेळला आणि जिंकलादेखील. प्रत्येक क्षणाचा आनंद त्याने लुटला. फ्रँ क सिनात्रा यांची ‘आय डीड इट इन माय वे’ अशी अजरामर म्हण आहे. धोनीने क्रिकेटमध्ये असेच सार्वभौमत्व गाजवले. ‘माही वे’ वृत्तीच्या बळावर तो संस्कारीदेखील बनला.
धोनीने करिअर संपवण्याचा निर्णय घेतला, त्याचवेळी तो १५ वर्षांतील कामगिरीमुळे स्वत:चे कर्तृत्व, नेतृत्व सिद्ध करीत अनेकांच्या सन्मानासही पात्र ठरला. त्याने धावा तर काढल्याच. शिवाय यष्टीमागे अन्य खेळाडूंच्या तुलनेत अनेक गडीदेखील बाद केले. खरेतर जागतिक क्रिकेटमध्ये धोनीचे महत्त्व सिद्ध करणारी आकडेवारी बोलकी आहे. २००७ ला नेतृत्वाची जबाबदारी सांभाळणाºया या खेळाडूने आयसीसीच्या सर्व मोठ्या स्पर्धा जिंकल्या. देशाला कसोटीत नंबर वन बनवले. शिवाय आयपीएल आणि चॅम्पियन्स लीगमध्ये चुणूक दाखवली. भारतीय क्रिकेटमध्ये अनेक महान खेळाडू आहेत. माझ्या मते, धोनी हा मन्सूर अली खान पतोडी आणि सचिन तेंडुलकर यांच्यापाठोपाठ स्वत:ची पटकथा लिहिणारा तिसरा खेळाडू ठरला.