नवी दिल्ली : ‘महेंद्रसिंग धोनीने निकालाची सांगड कधीही भावनांशी घातली नाही. स्वत:चे आचरण आणि खेळाप्रती असलेल्या समर्पित भावनेनुळे इतरांसाठी तो आदर्श खेळाडू ठरला. निकालाची पर्वा न केल्यामुळेच तो यशस्वी होऊ शकला,’ असे मत माजी दिग्गज फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण याने बुधवारी व्यक्त केले.
‘धोनीने स्वत:मागे मोठा वारसा सोडून निवृत्ती जाहीर केली. मैदानावर मोठ्या हिमतीने संकटांना सामोरे गेलेला धोनी आयसीसीच्या सर्व स्पर्धा जिंकणारा एकमेव कर्णधार ठरला. भारताचे नेतृत्व करणे कुणासाठीही परीक्षा आहे. जगभरातून तुमच्याकडून अपेक्षा वाढतात. तरीही धोनीने निकाल आणि भावना यांची कधीही सांगड घातली नाही. त्याने केवळ चाहतेच नव्हे, तर लाखो भारतीयांना प्रेरणा दिली. देशाचा ब्रॅण्ड दूत बनण्यासाठी स्वत:चे आचरण कसे असावे हे दाखवून दिल्यामुळे धोनी अनेकांसाठी सन्माननीय व्यक्ती बनू शकला,’ असे मत लक्ष्मणने ‘क्रिकेट कनेक्टेड’ या कार्यक्रमात व्यक्त केले. धोनी निवृत्त झाला तेव्हा खेळाडूंसह चित्रपट अभिनेते, उद्योगपती आणि राजकीय मंडळींनीही त्याच्याबाबत आदर व्यक्त करणारे वक्तव्य केले. (वृत्तसंस्था)