Join us  

धोनीला 'डच्चू' नाही; 'तो' टीम इंडियात नसण्याचं खरं कारण वेगळंच! 

इंग्लंडमधील वर्ल्ड स्पर्धेनंतर महेंद्रसिंग धोनी क्रिकेट मैदानापासून दूर आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2019 12:08 PM

Open in App
ठळक मुद्देनिवड समितीने धोनीला का वगळलं, धोनी पुन्हा मैदानावर दिसणार का, यावरून तर्कवितर्क लढवले जात आहेत.विश्वचषकात धोनीकडून लौकिकाला साजेशी कामगिरी झाली नाही, असं टीका झाली होती.द. आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत यष्टिरक्षक म्हणून रिषभ पंतला संधी देण्यात आलीय.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या ट्वेन्टी-20 मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर झाला आहे. त्यात महेंद्रसिंग धोनीची निवड न झाल्यानं चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. निवड समितीने धोनीला का वगळलं, धोनी पुन्हा मैदानावर दिसणार का आणि कधी, यावरून तर्कवितर्क लढवले जात आहेत. परंतु, धोनीला संघातून वगळण्यात आलेलं नाही, त्याला डच्चू दिलेला नाही, असं निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी स्पष्ट केलं आहे. त्याला संघात स्थान न मिळण्याचं खरं कारण त्यांनी सांगितलंय. 

खरं तर, इंग्लंडमधील वर्ल्ड स्पर्धेनंतर महेंद्रसिंग धोनी क्रिकेट मैदानापासून दूर आहे. विश्वचषकात धोनीकडून लौकिकाला साजेशी कामगिरी झाली नाही, असं टीका झाली होती. त्यानंतर, त्याच्या निवृत्तीच्या चर्चाही जोरात होत्या. या दरम्यान, धोनीनेच एक मोठी घोषणा केली होती. वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी मी उपलब्ध नाही, भारतीय लष्करासोबत काश्मीरमध्ये सरावासाठी जात आहे, असं सांगून त्यानं संभ्रम वाढवला होता. अर्थात, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मायदेशात होणाऱ्या मालिकेत धोनी मैदानावर उतरेल, अशी खात्री चाहत्यांना होती. कारण, त्याचा लष्करासोबतचा सरावही संपला आहे. परंतु, त्याची संघात निवडच झाली नाही. त्याच्याऐवजी यष्टिरक्षक म्हणून रिषभ पंतला संधी देण्यात आलीय. त्यामुळे बरेच जण निवड समितीवर निशाणा साधत आहेत. 

परंतु, महेंद्रसिंग धोनीने स्वतःच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी उपलब्ध नसल्याचं कळवल्यानं त्याची निवड झाली नसल्याचा खुलासा एमएसके प्रसाद यांनी केला आहे. धोनी सध्या अमेरिकेत असल्याचं कळतं. त्यामुळे पुन्हा शंकाकुशंका निर्माण झाल्यात. क्रिकेट मैदानापासून धोनी जाणीवपूर्क दूर राहतोय का, त्याच्या मनात नेमकं काय सुरू आहे, टी-२० वर्ल्ड कपमध्ये तो खेळेल की नाही, हे समजायला मार्ग नाही.

दरम्यान, भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरालाही दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेन्टी-20 मालिकेत स्थान देण्यात आलेले नाही.

द. आफ्रिकेविरुद्धच्या तीन टी-२० सामन्यांसाठी भारतीय संघ असाः 

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), के एल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, रिषभ पंत (यष्टिरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, कृणाल पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, खलील अहमद, दीपक चहर, नवदीप सैनी.

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीभारतीय क्रिकेट संघजसप्रित बुमराहविराट कोहलीरोहित शर्मा