डाव्या गुडघ्यावर दुखापत असूनही महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मधील सर्व सामने खेळला. आयपीएल २०२३ चे जेतेपद नावावर केल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधाराच्या गुडघ्यावर या महिन्याच्या सुरुवातीला मुंबईत शस्त्रक्रिया झाली आणि तो सध्या त्यातून सावरतोय.
"आम्ही त्याला कधीच 'तुला खेळायचे आहे की बाहेर बसायचे आहे' असे विचारले नाही. जर त्याला खेळायचे नसते तर त्याने आम्हाला लगेच सांगितले असते," असे CSKचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी ESPNcricinfo तमिळला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. "आम्हाला माहित होते की त्याच्यासाठी खेळणे हा एक संघर्ष होता, परंतु त्याची संघाप्रती असलेली बांधिलकी त्या दृष्टीकोनातून त्याचे नेतृत्व आणि संघाला कसा फायदा होतो हे सर्वांनाच ठाऊक आहे. तुम्हाला त्याचे कौतुक करावे लागेल.''
"फायनलपर्यंत, त्याने कधीही त्याच्या गुडघ्याबद्दल कोणाकडेही तक्रार केली नाही. पण, सर्वांना हे माहित होते आणि तुम्ही त्याला धावताना संघर्ष करताना पाहिले असेल, परंतु त्याने एकदाही तक्रार केली नाही. अंतिम फेरीनंतर, तो म्हणाला, 'ठीक आहे, मी शस्त्रक्रिया करून घेईन. त्याची शस्त्रक्रिया पूर्ण झाली आहे, तो बरा होत आहे,''असेही त्यांनी सांगितले.
"काय करायचं, कसं करायचं हे त्याला माहीत आहे, म्हणून आम्ही त्याला 'तू काय करणार आहेस, कसं' वगैरे विचारणार नाही. तो आम्हाला स्वतःहून कळवेल. तो काहीही करत असला तरी तो प्रथम कॉल एन श्रीनिवासन यांना करेल. २००८ पासून हे असेच चालू आहे. हे असेच चालू राहील,"असेही त्यांनी पुढे म्हटले.
"हे सर्व खेळाचा भाग आहे. शेवटच्या सामन्यानंतर, लोकांनी ऑनलाइन व्हिडिओ पाहिले आणि असे मानले की मी जडेजाला शांत करत आहे, पण तसे नव्हते. मी त्याच्याशी सामन्याबद्दल बोलत होतो. इतर कोणतीही चर्चा नाही. धोनीबद्दल त्याला नेहमीच आदर आहे,''असे विश्वनाथन यांनी सांगितले. आयपीएल जेतेपदानंतर जडेजा म्हणाला होता, 'मी ही खेळी धोनीला समर्पित करतो.'