Join us

धोनी हा प्रभावी कर्णधार, सर्वोत्कृष्ट रणनीतिकार! फाफ डुप्लेसिसकडून कौतुक

धोनीच्या नेतृत्वात डुप्लेसिस सीएसके संघाकडून आयपीएलमध्ये २०११ ते २०१५ आणि २०१८ ते २०२१ या काळात खेळला. मागच्या सत्रात त्याने आरसीबीचे कर्णधारपद भूषविले. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2023 05:49 IST

Open in App

बंगळुरू : महेंद्रसिंग धोनी हा प्रभावी कर्णधार आणि सर्वोत्कृष्ट रणनीतिकार असून, त्याच्याकडून नेतृत्वाचे गुण शिकताना परिपक्व बनण्यास मदत झाल्याचे मत दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डुप्लेसिस याने व्यक्त केले आहे. धोनीच्या नेतृत्वात डुप्लेसिस सीएसके संघाकडून आयपीएलमध्ये २०११ ते २०१५ आणि २०१८ ते २०२१ या काळात खेळला. मागच्या सत्रात त्याने आरसीबीचे कर्णधारपद भूषविले. 

नेतृत्वागुणाबाबत आरसीबीच्या पॉडकास्टमध्ये डुप्लेसिस म्हणाला,‘ मी ग्रॅमी स्मिथ आणि धोनीसारखा कर्णधार बनू शकणार नाही याची जाणीव होताच स्वत:ला विकसित करण्याचा निर्णय घेतला. कारकिर्दीत स्वत:चे कौशल्य विकसित केले नाही, तर तुमच्या वाईट काळात चाहते टीका करू लागतात. सीएसकेत पदार्पण केले तेव्हा न्यूझीलंडचे माजी कर्णधार आणि सीएसकेचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांच्यासोबत बराच वेळ घालविला. कर्णधारपदाबाबत त्यांचे विचार समजून घेत होतो.’ 

त्याचप्रमाणे, ‘नेतृत्व क्षमतेचे बारकावे आत्मसात करण्यावर माझा भर होता. दिग्गज कर्णधारांकडून काही शिकण्याचा दृष्टिकोन असल्याने मी अधिक माहिती जाणून घेण्याबाबत रोमांचित होतो. राष्ट्रीय संघात मी प्रवेश केला त्यावेळी ग्रॅमी स्मिथकडे दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व होते. तो बोलायचा त्यावेळी ड्रेसिंग रूममध्ये शांतता असायची,’ असेही डुप्लेसिस म्हणाला.   

सीएसके संघातील अनुभवाविषयी डुप्लेसिस म्हणाला की, ‘कारकिर्दीच्या सुरुवातीलाच मला सीएककेकडून खेळण्याची संधी लाभली. त्यामुळे महान कर्णधारांपैकी एक असलेले फ्लेमिंग यांच्याकडून मोठे मार्गदर्शन मिळाले. मानव व्यवस्थापन आणि व्यक्तींसोबतचे संबंध विकसित कसे करायचे या नव्या गोष्टी शिकता आल्या. फ्लेमिंग यांच्या बाजूला बसणे आणि त्यांच्याकडून शिकून घेणे हे माझे भाग्य मानतो.’

धोनीमुळे हिंमत वाढली...महेंद्रसिंग धोनी हा खेळातील उत्कृष्ट रणनीतिकार आहे. तो तितकाच प्रभावी नेतृत्वकर्तादेखील आहे. त्याच्याकडून खंबीरवृत्ती शिकण्यासारखी आहे. आयपीएलमध्ये त्याच्यासोबत खेळताना याच गोष्टी मी आत्मसात केल्या. त्याचा फायदाही झाला,’ असे सांगत डुप्लेसिसने २०१६ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील घटनेला उजाळाही दिला. त्यावेळी होबार्ट कसोटीत चेंडू चमकविण्यासाठी डुप्लेसिसने लाळेचा वापर केला होता. त्याच्यावर निरर्थक आरोप लागले. ‘ऑस्ट्रेलियाला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी मी सज्ज झालो. हा सामना आम्ही ८० धावांनी जिंकला होता. तोंडात चॉकलेट ठेवून चेंडू चमकविल्याचा माझ्यावर ठपका ठेवण्यात आला होता. माझ्यावर सामना शुल्काच्या शंभर टक्के रकमेचा दंड ठोठावण्यात आला होता. पण, ॲडलेडची पुढील कसोटी खेळण्याची मला परवानगी मिळाली होती. मी न डगमगता खेळत राहिलो,’ असे डुप्लेसि म्हणाला.

टॅग्स :महेंद्रसिंग धोनी
Open in App