Join us

धोनीला ‘ब्रेक’ ही मोठी घडामोड

टी-२० आणि आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी निवडकर्त्यांनी जो संघ निवडला आहे, त्यातील सर्वात लक्षवेधी निर्णय आहे तो म्हणजे महेंद्रसिंह धोनीला टी-२० संघातून डच्चू आणि दुसरा म्हणजे रोहित शर्माला कसोटी संघात पुन्हा संधी.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2018 06:47 IST

Open in App

- अयाझ मेमनटी-२० आणि आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी निवडकर्त्यांनी जो संघ निवडला आहे, त्यातील सर्वात लक्षवेधी निर्णय आहे तो म्हणजे महेंद्रसिंह धोनीला टी-२० संघातून डच्चू आणि दुसरा म्हणजे रोहित शर्माला कसोटी संघात पुन्हा संधी. याशिवाय बरेच बदल झाले आहेत. मुरली विजय, पार्थिव पटेलचे कसोटीमध्ये पुनरागमन, तर कृणाल पांड्याचे टी-२० क्रिकेटमध्ये पुनरागमन या बदलांपेक्षा धोनी आणि रोहित यांच्याबाबत जो निर्णय घेतला गेला तो महत्त्वाचा आहे. कारण, धोनीचे टी-२० संघात नसणे ही भारतीय क्रिकेटमधील सर्वात मोठी घडामोड आहे.रोहितचे गेल्या चार-पाच वर्षांपासून कसोटी संघात येणे-जाणे सुरू आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये हा खेळाडू जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. परंतु कसोटीत तो आपली जागा पक्की करू शकला नाही. त्यामुळे रोहितसाठी ही चांगली संधी असेल. दुसरीकडे, धोनीला टी-२० संघातून डच्चू देणे ही सर्वात मोठी बातमी आहे. कारण तो असा खेळाडू आहे, जो जेव्हापासून खेळत आलाय तेव्हापासून कधी संघाबाहेर राहिलेला नाही. त्याने २०१४ मध्ये आॅस्ट्रेलियात कसोटी मालिकेदरम्यान न खेळण्याचा निर्णय घेतला होता. हा त्याचा स्वत:चा निर्णय होता. २००७ चा टी-२० आणि २०११ चा एकदिवसीय विश्वचषक जिंकल्यानंतर धोनीने विक्रमावर विक्रम नोंदवले. तो एक असा खेळाडू बनला होता, जो सर्व क्रिकेटमध्ये वेगळे स्थान निर्माण करू शकला. त्याला कुणीही बाहेर ठेवू शकत नव्हते. महान खेळाडूंच्या यादीत धोनीचे नाव आहे. त्यानंतर विराटने सर्व क्षेत्रांत स्वत:ला सिद्ध केले. त्यामुळे धोनीचे टी-२० संघात न राहणे ही सर्वात मोठी घडामोड आहे. भविष्यात त्याचा परिणाम आगामी विश्वचषकावरही दिसून येईल.धोनीबाबतचा निर्णय विश्वासात घेऊनच घेतलेला असेल. कारण, केदार जाधव, करुण नायर, मुरली विजय या खेळाडूंनी आपल्याला विश्वासात न घेता संघातून वगळले, असा आरोप केला होता. यावेळी निवडकर्त्यांनी धोनीसोबत चर्चा केली असेल. त्यानंतरच हा निर्णय घेतलेला असावा. त्याच्याबाबतचा निर्णय आजचा नाही. काही दिवसांपासून निवडकर्ते यावर विचार करीत असतील. यावरून स्पष्ट होते, की आगामी विश्वचषक हा धोनीचा शेवटचा असेल. त्याने जरी निवृत्तीबाबत स्पष्ट केले नसले तरी यातून ते स्पष्ट होते. आपल्यातील क्रिकेट जिवंत ठेवण्यासाठी तो आयपीएल खेळत राहील; पण मुख्य क्रिकेटमधून तो निवृत्त होईल, असे मला वाटते. २०१९ चा विश्वचषक हा धोनीचा शेवटचा विश्वचषक असेल, तर २०२० मध्ये टी-२० विश्वचषकासाठी एका यष्टिरक्षक-फलंदाजाचा शोध सुरू होईल. विश्वचषकानंतर निवडकर्त्यांकडे या शोधासाठी खूप कमी वेळ असेल. त्यामुळे आज जो निर्णय घेतला आहे तो खूप सावध आणि समजूतदारपणाचा आहे. त्याचे स्वागत व्हायला हवे. ऋषभ पंत किंवा ईशान किशन जो देवधर क्रिकेटमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. या दोघांमध्ये यष्टिरक्षकासाठी स्पर्धा असेल. माझ्या मते, या निर्णयात धोनीही सहभागी आहे. धोनीलाही विश्वचषकावर लक्ष केंद्रित करण्यासाठी वेळ मिळेल.(लेखक लोकमतचे संपादकीय सल्लागार आहेत)

टॅग्स :महेंद्रसिंह धोनी