Join us

मॅच फिक्सिंग, अब्रूनुकसान अन् १०० कोटी... धोनीची आयपीएस अधिकाऱ्याविरोधात न्यायालयात धाव

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने मद्रास उच्च न्यायालयात पोलीस अधिकारी जी. संपत कुमार यांच्याविरोधातील खटल्यात दाद मागितली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2022 07:52 IST

Open in App

चेन्नई :  

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने मद्रास उच्च न्यायालयात पोलीस अधिकारी जी. संपत कुमार यांच्याविरोधातील खटल्यात दाद मागितली आहे. या आयपीएस अधिकाऱ्याविरोधात न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी खटला चालवावा, असे धोनीने याचिकेत म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयासंदर्भात संपत यांनी केलेल्या विधानांच्या आधारे धोनीने ही मागणी केली आहे.

भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वांत यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या धोनीने २०१४ साली संपत यांच्याविरोधात खटला दाखल केला होता. त्यावेळेस संपत हे पोलीस महानिरीक्षकपदावर कार्यरत होते. मॅच-फिक्सिंगसंदर्भात संपत यांच्याकडून केल्या जाणाऱ्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर धोनीने न्यायालयामध्ये धाव घेतली होती. संतप यांनी आपल्याविरोधात अशी कोणतीही विधाने करू नयेत, असे निर्देश न्यायालयाने द्यावेत, अशी धोनीची विनंती होती. झालेल्या अब्रूनुकसानीचा मोबदला म्हणून १०० कोटी रुपयांची नुकसानभरपाई द्यावी, अशीही मागणी धोनीने केली होती. न्यायालयाने या पोलीस अधिकाऱ्याला धोनीविरोधात विधाने न करण्याचे निर्देश दिले होते.

आयपीएलमध्ये झालेल्या मॅच-फिक्सिंग प्रकरणानंतर या गोष्टी घडल्या होत्या. यानंतर धोनीने संपत यांच्याविरोधात पुन्हा न्यायालयामध्ये धाव घेतली असून, प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. संपत यांनी न्यायव्यवस्था आणि काही वकिलांबद्दल अपमानास्पद विधाने केल्याचा दावा या प्रतिज्ञापत्रात करण्यात आला आहे. १८ जुलै रोजी धोनीने महाअधिवक्त्यांकडून या अधिकाऱ्याविरोधात न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी याचिका दाखल करण्यासंदर्भातील संमती घेतली होती. ही संमती मिळाल्यानंतरच धोनीने आता मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतल्याची माहिती  वृत्तसंस्थेने दिली आहे.

टॅग्स :महेंद्रसिंग धोनी
Open in App