Dhoni Eating His Bat ipl 2022 Amit Mishra : चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) सर्वोत्तम फिनिशरपैकी एक आहे. IPL 2022 मध्येही धोनीनं चांगली कामगिरी केली आहे. या मोसमातही एमएस धोनी सीएसकेसाठी (CSK) फिनिशर म्हणून उत्तम कामगिरी पार पाडत आहे. दिल्ली कॅपिटल्स (DC) विरुद्धच्या सामन्यातही त्याची एक छोटी पण स्फोटक खेळी पाहायला मिळाली. पण या मॅचमधील धोनीचा एक फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. त्या फोटोमध्ये धोनी आपली बॅट चावताना दिसत आहे. धोनी असे का करतो याचा खुलासा एका भारतीय खेळाडूने केला आहे.
एमएस धोनी यापूर्वीही आपली बॅट चावताना दिसला होता. तो फलंदाजीपूर्वी असं का करतो याचा गौप्यस्फोट भारतीय संघाचा खेळाडू अमित मिश्रा यानं केला आहे. तो आपली बॅट साफ ठेवण्यासाठी असं करतो, अशी माहिती अमित मिश्रानं दिली. “जर तुम्ही विचार करत असाल की धोनी आपली बॅट का चावतो. तर तो आपल्या बॅटवरून टेप हटवण्यासाठी असं करतो. कारण त्याला आपली बॅट साफ राहावी असं वाटतं. तुम्ही त्याच्या बॅटमधून एकही टेप किंवा धागा निघालेलं पाहिलं नसेल,” असं अमित मिश्रा म्हणाला.
दिल्ली विरुद्ध तुफान फटकेबाजी
धोनीनं दिल्ली कॅपिटल्सविरोधात तुफान फटकेबाजी केली. त्यानं ८ चेंडूंमध्ये २१ धावा ठोकल्या. यादरम्यान त्यानं १ चौकार आणि २ षटकार लगावले. आयपीएल २०२२ मध्ये त्यानं ११ सामन्यांमध्ये ३२.६० च्या सरासरीनं १६३ धावा केल्या. तसंच त्यानं १ अर्धशतकही ठोकलं. पुन्हा एकदा धोनीच्या हाती चेन्नई सुपर किंग्सचं कर्णधारपद येताच संघ पुन्हा ट्रॅकवर येताना दिसत आहे.