बेबी एबी डिव्हिलियर्स म्हणून प्रसिद्ध असलेल्या डेवाल्ड ब्रेव्हिसने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या नाकी नऊ आणले. डेवाल्ड ब्रेव्हिसने ४१ चेंडूत १२५ धावा ठोकून ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वात जलद टी-२० शतकाचा विक्रम आपल्या नावावर नोंदवला. डेवाल्ड ब्रेव्हिसपूर्वी हा विक्रम न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्टिलच्या नावावर होता. त्याने २०१८ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४९ चेंडूत शतक झळकावले होते. दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज फाफ डू प्लेसिसने २०१५ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध ११९ धावांची वैयक्तिक खेळी केली होती, तो ही विक्रम डेवाल्ड ब्रेव्हिसने मोडला.
डेवाल्ड ब्रेव्हिसने आपल्या खेळीत दोन चौकार आणि आठ षटकार ठोकले. डेवाल्ड ब्रेव्हिस हा टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद टी-२० शतक झळकावणारा दुसरा दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज ठरला आहे. त्याच्यापुढे दक्षिण आफ्रिकेचा विस्फोटक फलंदाज डेव्हिड मिलर आहे, ज्याने अवघ्या ३५ चेंडूत शतक ठोकले आहे. डेवल्ड ब्रेव्हिसच्या या खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० इतिहासात सर्वाधिक धावसंख्या (२१८/७) केली. यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांची सर्वोत्तम धावसंख्या २०१/४ अशी होती.
दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा टी-२० सामना डार्विनमध्ये खेळला गेला. या सामन्यात आफ्रिकन संघाची सुरुवात खराब झाली. एका वेळी दक्षिण आफ्रिकेने फक्त ५७ धावांत ३ विकेट्स गमावल्या होत्या. पण त्यानंतर डेवल्ड ब्रेव्हिसच्या वादळी खेळीने संपूर्ण खेळच बदलून टाकला. ब्रेव्हिसने २५ चेंडूत अर्धशतक ठोकून आपले इरादे स्पष्ट केले. त्याने आपल्या वादळी खेळीचे शतकात रूपांतर करून दक्षिण आफ्रिकेला विशाल धावसंख्येपर्यंत पोहोचवले.