देशांतर्गत विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत देवदत्त पडिक्कल जबरदस्त कामगिरी करत आहे. सातत्यपूर्ण खेळीचा नजराणा पेश करताना मंगळवारी त्याने आणखी एक दमदार डाव खेळला. कर्नाटकच्या संघाकडून मैदानात उतरलेल्या देवदत्त पडिक्कल याने राजस्थान विरुद्धच्या सामन्यात ९१ धावांची खेळी साकारली. या सामन्यात त्याचे शतक अवघ्या ९ धावांनी हुकले. ८२ चेंडूचा सामना करताना त्याच्या बॅटमधून १२ चौकार आणि २ षटकार पाहायला मिळाले. या खेळीसह त्याने मोठा डाव साधला आहे. आतापर्यंत जे कुणाला जमलं नाही ते कर्नाटकच्या बॅटरनं करून दाखवलं आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
असा पराक्रम करणारा पहिला फलंदाज ठरला देवदत्त पडिक्कल
राजस्थान विरुद्धच्या सामन्यात देवदत्त पडिक्कल याने यंदाच्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील हंगामात ६०० धावांचा टप्पा पार केला. यासह या स्पर्धेत तीन हंगामात ६०० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. याआधी २०१९-२० च्या हंगामात त्याने ११ सामन्यात ६०९ धावा केल्या होत्या. या हंगामात तो सर्वाधिक धावा करणारा खेळाडूही ठरला होता. त्यानंतर २०२०-२१ च्या हंगामात त्याने फक्त ७ डावात ७३७ धावा केल्या होत्या. त्यात आता यंदाच्या हंगामातील कामगिरीची भर पडली आहे.
देवदत्त पडिक्कलची यंदाच्या हंगामातील कामगिरी
देवदत्त पडिक्कल याने यंदाच्या हंगामातील ६ सामन्यातील ६ डावात ४ शतके आणि एक अर्धशतक झळकावले आहे. तामिळनाडूविरुद्धच्या सामना वगळता प्रत्येक सामन्यात त्याने दमदार खेळी केली आहे.
- विरुद्ध झारखंड १४७ धावा (११८ चेंडूत)
- विरुद्ध केरळ १२४ धावा (१३७ चेंडूत)
- विरुद्ध तामिळनाडू २२ धावा
- विरुद्ध पुडुचेरी ११३ धावा (११६ चेंडूत)
- विरुद्ध त्रिपुरा १०८ धावा (१२० चेंडूत)
- विरुद्ध राजस्थान ९१ धावा (८२ चेंडूत)