सनरायझर्स हैदराबादने आरसीबीचा ४२ धावांनी पराभव करून मोठा विजय मिळवला. इशान किशनच्या दमदार खेळीच्या जोरावर हैदराबादने २० षटकांत सहा विकेट्स गमावून २३१ धावा केल्या. प्रत्युत्तरात फिल साल्ट आणि विराट कोहली यांनी संघाला चांगली सुरुवात दिली. मात्र, त्यानंतर आरसीबीने एकापाठोपाठ विकेट्स गमावल्या. आरसीबीचा संघ १८९ धावांवर ऑलआऊट झाला.
लक्ष्याचा पाठलाग करताना कोहली आणि साल्टने आरसीबीला चांगली सुरुवात करून दिली. आरसीबीने पॉवर प्लेमध्ये एकही विकेट न गमावता ७२ धावा केल्या. हर्ष दुबेने विराट कोहलीला बाद करून आरसीबीला पहिला धक्का दिला. त्याने २५ चेंडूत ४३ धावा केल्या. कोहलीने सॉल्टसोबत पहिल्या विकेटसाठी ८० धावांची भागीदारी केली. कोहली बाद झाल्यानंतरही सॉल्टने आक्रमक खेळी सुरूच ठेवली. फिल साल्टने २७ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. आरसीबीने ९ षटकांत १०० धावांचा टप्पा ओलांडला.
आरसीबीने एकापाठोपाठ विकेट्स गमावल्याफिल साल्ट बाद झाल्यानंतर आरसीबीचा संघ डगमगला. आरसीबीने ठराविक अंतरानंतर एकापाठोपाठ विकेट्स गमावल्या. आरसीबीने १५ षटकांत तीन गडी गमावून १६७ धावा केल्या होत्या. मात्र, त्यानंतर आरसीबीच्या कोणत्याही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. हैदराबादकडून पॅट कमिन्सने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. तर, इशान मलिंगाने दोन विकेट्स मिळवल्या.
हैदराबादचे आरसीबीसमोर २३२ धावांचे लक्ष्यआरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतली. अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड या सलामी जोडीने पहिल्या विकेटसाठी ५४ धावांची भागीदारी रचली. लुंगी एनगिडीने अभिषेक शर्माला बाद करून हैदराबादला पहिला धक्का दिला. यानंतर भुवनेश्वर कुमारने ट्रॅव्हिस हेडला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. हेनरिक क्लासेन आणि इशान किशन यांनी तिसऱ्या विकेट्ससाठी ४८ धावांची भागीदारी केली. सुयश शर्माने क्लासेनला बाद करून ही भागीदारी मोडली. क्लासेनने १३ चेंडूत दोन चौकार आणि दोन षटकारांसह २४ धावा केल्या. त्यानंतर अनिकेतने नऊ चेंडूत एका चौकार आणि तीन षटकारांसह २६ धावा केल्या. या सामन्यातही नितीश रेड्डी स्वस्तात बाद झाला. त्यानंतर शेफर्डने अभिनव मनोबरला बाद केले. मात्र, इशानने एका बाजुने फटकेबाजी सुरूच ठेवली. इशानच्या फलंदाजीच्या जोरावरच हैदराबादला २३० धावांचा टप्पा ओलांडला. आरसीबीकडून शेफर्डने सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या. तर भुवनेश्वर, एनगिडी, सुयश आणि कृणाल यांना प्रत्येकी एक-एक विकेट मिळाली.