आयपीएल २०२५ च्या मध्यातच दिल्ली उच्च न्यायालयाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला मोठा झटका दिला. आरसीबीने सनरायझर्स हैदराबादचा क्रिकेटपटू ट्रॅव्हिस हेडच्या जाहिरातीवर बंदी घालण्यासाठी अर्ज दाखल केला, जो न्यायालयाने फेटाळून लावला. या याचिकेत सनरायझर्स हैदराबादचा क्रिकेटर ट्रॅव्हिस हेड असलेल्या उबर मोटोच्या कथित अपमानास्पद यूट्यूब जाहिरातीवर अंतरिम स्थगिती लागू करण्याची विनंती करण्यात आली होती.
न्यायमूर्ती सौरभ बॅनर्जी म्हणाले की, या जाहिरातीत कोणत्याही हस्तक्षेपाची आवश्यकता नाही. ही जाहिरात क्रिकेट खेळाच्या संदर्भात, खिलाडूवृत्तीच्या भावनेच्या संदर्भात आहे. न्यायालयाच्या मते, या याचिकेवर विचार करताना न्यायालयाचा कोणताही हस्तक्षेप आवश्यक नाही. यामुळे आरसीबीची याचिका फेटाळण्यात आली. आरसीबीच्या अंतरिम अर्जावर न्यायालयाने हा आदेश दिला.
रॉयल चॅलेंजर्स स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडने उबर इंडिया सिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेडविरुद्ध दावा दाखल केला आहे की, उबर मोटोची 'बेडीज इन बेंगलोर' ही यूट्यूब जाहिरात त्यांच्या ट्रेडमार्कचे उल्लंघन करते. या जाहिरातीचे वर्णन करताना आरसीबीच्या वकिलांनी सांगितले की, संबंधित जाहिरातीमध्ये सनरायझर्स हैदराबादने आरसीबी ट्रेडमार्कचा वापर करत आहे.ही जाहिरात आतापर्यंत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर १३ लाख वेळा पाहिली गेली आहे आणि वापरकर्त्यांकडून त्यावर अनेक प्रतिक्रिया देखील आल्या आहेत.