Join us  

Delhi Capitals Owner Parth Jindal Tweet, IPL 2022 DC vs PBKS: "४ दिवस संपूर्ण वेळ खोलीत बंद राहून..."; दिल्लीच्या दमदार विजयानंतर संघमालकांचे खास ट्वीट

धडाकेबाज विजयश्री नंतर झुंजार खेळाडूंची थोपटली पाठ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 2:24 PM

Open in App

Delhi Capitals Owner Parth Jindal Tweet, IPL 2022 DC vs PBKS: IPLच्या बायोबबलमध्ये कोरोनाने शिरकाव केला. दिल्लीच्या संघातील काही खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे बुधवारचा दिल्ली वि पंजाब सामना होणार की नाही, हा प्रश्न होता. पण अखेर तो सामना झाला आणि त्यात दिल्लीने पंजाबवर एकतर्फी विजय मिळवला. दिल्लीच्या ताफ्यातील फिरकीपटू अक्षर पटेल, कुलदीप यादव आणि ललित यादव यांनी छान गोलंदाजी करत पंजाबला ११५ धावांवर रोखले. तर पृथ्वी शॉ आणि डेव्हिड वॉर्नर यांनी शानदार फलंदाजी करत संघाला ९ गडी राखून विजय मिळवून दिला. त्यानंतर त्यांचे संघमालक पार्थ जिंदाल यांनी सर्व खेळाडूंचे कौतुक केले.

"जरा विचार करा, चार दिवस तुम्ही एकाच खोलीत बंद आहात. तुम्हाला सांगितलं जातं की तुम्ही ज्या मित्रासोबत डिनर केलंत तो खेळाडू कोविड पॉझिटिव्ह आहे. त्यानंतर असंही सांगितलं जातं की तुम्हाला जगातील सर्वात मोठी टी२० लीग IPL मध्ये जाऊन सामना खेळायचा आहे. त्यावेळी तुम्ही समोरच्या संघाची अवस्था ८ बाद ९२ अशी करता.... ही गोष्ट खरंच अविश्वसनीय आहे. हे दिल्ली कॅपिटल्सचं खरं स्पिरीट आहे. मी खरंच संघाच्या आजच्या कामगिरीने भारावून गेलोय. मला या संघातील खेळाडूंबद्दल प्रचंड आदर वाटतोय. कम ऑन दिल्ली कॅपिटल्स.. असेच झुंजार राहा. माझा संघातील सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफना सलाम", असं प्रेरणादायी ट्वीट पार्थ जिंदाल यांनी केले.

दरम्यान, सामन्यात पंजाबच्या संघाने प्रथम फलंदाजी केली. त्यांची फलंदाजी अतिशय वाईट झाली. नव्या दमाचा जितेश शर्मा याने सर्वाधिक ३२ तर कर्णधार मयंक अग्रवालने २४ धावा केल्या. इतर सर्व फलंदाज झटपट बाद झाले. ललित, अक्षर आणि कुलदीप या दिल्लीच्या फिरकी त्रिकुटाने सहा बळी टिपत संघाला ११५ धावांत रोखले. प्रत्युत्तरात दिल्लीचा पृथ्वी शॉ २० चेंडूत ४१ धावांवर बाद झाला. पण डेव्हिड वॉर्नरने ३० चेंडूत नाबाद ६० धावा करत संघाला विजय मिळवून दिला.

टॅग्स :आयपीएल २०२२दिल्ली कॅपिटल्सडेव्हिड वॉर्नरपृथ्वी शॉ
Open in App