- रोहित नाईक
सध्याच्या आयपीएल संघांपैकी दिल्ली कॅपिटल्स एकमेव असा संघ आहे, ज्यांनी अद्याप एकदाही अंतिम सामना खेळलेला नाही. दिल्ली डेअरडेव्हिल्स नावाने सहभागी झालेल्या दिल्लीकरांनी आतापर्यंत चार वेळा बादफेरी गाठली. गेल्याच वर्षी ‘दिल्ली कॅपिटल्स’ नावाने सहभागी झालेल्या या संघाने तिसरे स्थान मिळवले. त्यामुळे यंदा दिल्लीकडून मोठ्या अपेक्षा आहेत.
युवा व अनुभवी खेळाडूंचा चांगल्या ताळमेळमुळे दिल्ली विजेतेपदाचे प्रबळ दावेदार आहेत. शिखर धवन व रविचंद्रन अश्विन या अनुभवी खेळाडूंच्या उपस्थितीत कर्णधार श्रेयस अय्यरला मोठी मदत होईल. आयपीएलच्या सुरुवातीच्या दोन वर्षात बादफेरी गाठत दिल्लीकरांनी छाप पाडली. परंतु, यानंतर त्यांच्या कामगिरीत सातत्य राहिले नाही. २०१२मध्ये बादफेरीत आव्हान संपुष्टात आल्यानंतर सलग ६ वर्षे दिल्लीला बादफेरी गाठण्यात यश आले नव्हते. गतवर्षी मात्र दिल्लीने युथ पॉवरच्या जोरावर बादफेरी गाठली होती. पृथ्वी शॉ, धवन व अय्यर अशी दिल्लीची आघाडीची फळी असून त्यांच्या जोडीला अजिंक्य रहाणे आणि युवा ऋषभ पंत आहेत. गोलंदाजीही मजबूत आहे. अमित मिश्रा, अक्षर पटेल आणि आर. अश्विन या फिरकी त्रिकुटासह स्टार वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाही आहे.
सर्वोत्तम कामगिरी :२००९, २०१२, २०१९ साली तिसरे स्थान.
फलंदाजी : दिल्लीकडे भारताचे आघाडीचे फलंदाज असून त्यांच्याकडून मोठ्या धावसंख्येची अपेक्षा आहे. पृथ्वी-धवन ही सलामीची जोडी दिल्लीला वेगवान सुरुवात करून देईल. तसेच पंत आणि विंडीजचा शिमरॉन हेटमायर यांची वादळी खेळी दिल्लीसाठी महत्त्वाची ठरेल.
गोलंदाजी : फिरकी गोलंदाजीत दिल्लीची बाजू मजबूत आहे. मात्र वेगवान गोलंदाजीसाठी दिल्लीकर पूर्णपणे कागिसो रबाडावर अवलंबून आहेत. मोहित शर्मा नुकताच दुखापतीतून सावरला असून ईशांत शर्माला नियंत्रित मारा करावा लागेल.
मुख्य ताकद :
पृथ्वी-धवन यांची आक्रमक सुरुवात आणि पंत-हेटमायर यांची फटकेबाजी. संघाचे फिरकी गोलंदाज प्रतिस्पर्ध्यांना मोठ्या धावसंख्येपासून रोखू शकतात.