मुंबई : दिल्ली कॅपिटल्स संघाला कोरोनामुळे आधीच अनेक अडचणींचा सामना करावा लागत असताना आता मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांच्या परिवारातील एका सदस्याला कोराेनाची लागण झाली आहे. त्यामुळे पाँटिंग यांना पाच दिवस विलगीकरणात राहावे लागेल. दिल्ली कॅपिटल्स संघ व्यवस्थापनाकडून ही माहिती देण्यात आली आहे.
रिकी पाँटिंग यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली असली तरी संघ व्यवस्थापन कोणताही धोका पत्करण्यास तयार नाही. कारण आधीच संघातील काही खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमधील सदस्य कोरोनाबाधित झाल्याने दिल्लीपुढे अडचणींचा डोंगर उभा राहिला होता. शिवाय यामुळे त्यांचा पुण्यातील सामनाही मुंबईत हलवावा लागला होता. पाँटिंग यांच्याबाबत माहिती देताना संघ व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले की, ‘संघाच्या हिताला प्राध्यान्य देत आम्ही पाँटिंग यांना विलगीकरणात ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कारण त्यांंची चाचणी दोनदा निगेटिव्ह जरी आली असली तरी आम्हाला कोणताही धोका पत्करायचा नाही. त्यामुळे राजस्थानविरुद्धच्या सामन्यात ते संघासोबत नसतील.’