आयपीएल २०२५ स्पर्धेतील उर्वरित सामने येत्या १७ मे पासून खेळवले जाणार असल्याची बीसीसीआयने मंगळवारी माहिती दिली. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध संघर्षामुळे बीसीसीआयने यंदाची स्पर्धा एका आठवड्यासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, बीसीसीआयने पुन्हा ही स्पर्धा सुरू करण्याची घोषणा केली आणि सुधारित वेळापत्रक जाहीर केले. याच पार्श्वभूमीवर दिल्लीचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने आयपीएलमधील उर्वरित सामने खेळण्यास नकार दिला. त्यामुळे दिल्लीच्या संघाने त्याला तीन कोटीहून अधिक रुपयांचा दंड ठोठावला.
मिळालेल्या माहितीनुसार, मिचेल स्टार्कने आयपीएल २०२५ साठी भारतात परत न येण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याला ३.५ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. जर एखादा खेळाडू हंगामातील सर्व सामने खेळला नाही तर संघाला खेळाडूंचे वेतन कमी करण्याचा अधिकार आहे, असा आयपीएलमधील नियम आहे. या नियमानुसार, हे पैसे मिचेल स्टार्कच्या पगारातून कापले जातील.
आयपीएलच्या मेगा लिलावात मिशेल स्टार्कला खरेदी करण्यासाठी मुंबई इंडियन्स, केकेआर, दिल्ली कॅपिटल्स आणि आरसीबीने त्याच्यावर बोली लावली. अखेर दिल्ली कॅपिटल्सने बोली जिंकली आणि त्याला ११.७५ कोटी रुपयांत संघात समील करून घेतले. स्टार्कला या रकमेतून संघाला ३.५ कोटी रुपये द्यावे लागतील.
आयपीएल २०२५ च्या प्लेऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी दिल्लीला त्यांच्या उर्वरित तीन सामन्यात चांगली कामगिरी करून दाखवावी लागेल. अशातच मिचेल स्टार्कने आयपीएलमधून माघार घेतल्याने संघात पोकळी निर्माण होऊ शकते. मिचेल स्टार्क हा अत्यंत हुशार गोलंदाज आहे. याशिवाय, त्याला कठीण परिस्थितीत गोलंदाजी करण्याचा चांगला अनुभव आहे.