Delhi Capitals Appoint John Mooney First Irish Coach In IPL History : दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने इंडियन प्रीमियर लीग २०२६ च्या हंगामासाठी आपल्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा बदल केला आहे. आयर्लंडचा माजी अष्टपैलू खेळाडू जॉन मूनी (John Mooney) यांची संघाच्या नव्या फील्डिंग कोचच्या रुपात नियुक्ती करण्यात आली आहे. IPL च्या आतापर्यंतच्या इतिहासातील ते पहिले आयरिश कोच आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
जॉन मूनी यांच्यावर दिल्लीचा विश्वास
आगामी हंगामात संघाची रणनीती आणि बचाव (फील्डिंग) अधिक भक्कम करण्यासाठी ४४ वर्षीय जॉन मूनी यांच्यावर दिल्ली कॅपिटल्सने विश्वास दाखवला आहे. ते मागील हंगामापर्यंत ही जबाबदारी सांभाळणाऱ्या एंटोन रॉक्स आणि ज्ञानेश्वर राव यांची जागा घेणार आहेत.
"एकही प्याला नको रे बाबा!" चहलनं दारु सोडली; एबी डिव्हिलियर्सशी गप्पा मारताना तो नेमकं काय म्हणाला?
कोण आहेत जॉन मूनी?
जॉन मूनी हे आयर्लंड क्रिकेटमधील लोकप्रिय चेहरा आहे. २०११ च्या वनडे विश्वचषक स्पर्धेत आयर्लंड संघाने इंग्लंडविरुद्ध मिळवलेल्या ऐतिहासिक विजयात या दिग्गजाने मोलाचा वाटा उचलला होता. मूनी यांनी आयर्लंडकडून ६४ वनडे आणि २७ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यापूर्वी त्यांनी वेस्ट इंडिज आणि अफगाणिस्तान संघासोबत काम केले आहे. आशिया कप स्पर्धेदरम्यान ते अफगाणिस्तानच्या ताफ्यात होते.
दिल्ली कॅपिटल्सचा कोचिंग स्टाफ
- फलंदाजी प्रशिक्षक : हेमांग बदानी
- गोलंदाजी प्रशिक्षक: मुनाफ पटेल
- सहाय्यक प्रशिक्षक : इयान बेल
- क्रिकेट संचालक: वेणुगोपाल राव
दिल्ली कॅपिटल्स अजूनही पहिल्या जेतेपदाच्या प्रतिक्षेत
मागील हंगामात दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने पाचव्या स्थानावर स्पर्धा संपवली होती. आतापर्यंतच्या १८ हंगामात संघाला एकदाही जेतेपद पटकवता आलेले नाही. अजूनही संघ आपल्या पहिल्या आयपीएल विजेतेपदाच्या प्रतीक्षेत आहे. जॉन मूनी यांच्या नियुक्तीनंतर संघाच्या फील्डिंगमध्ये लक्षणीय सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. याचा संघाला कितपत फायदा होणार? दिल्ली कॅपिटल्सचा संघ ऐतिहासिक कामगिरी करून दाखवणार का? ते पाहण्याजोगे असेल.
पहिला सामना कधी?
आयपीएल २०२६ च्या यंदाच्या हंगामाची सुरुवात २८ मार्चला गत चॅम्पियन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध सनरायझर्स यांच्यातील लढतीनं होणार आहे. दिल्ली कॅपिटल्सचा संघ आपला पहिला सामना १ एप्रिल रोजी लखनौ सुपर जाएंट्सविरुद्ध खेळणार आहे.