Join us  

अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या थरारक सामन्यात पराभव, भारताचे आव्हान संपुष्टात

प्रथम फलंदाजी करताना भारताने ७ बाद २७४ धावांचे आव्हानात्मक मजल मारली.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 5:22 AM

Open in App

ख्राईस्टचर्च : अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या थरारक सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारतीय महिलांचे आव्हान तीन बळींनी परतवले. यासह भारताचा विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील प्रवेश थोडक्यात हुकला. अखेरच्या दोन चेंडूत दक्षिण आफ्रिकेला तीन धावांची गरज असताना दीप्ती शर्माकडून पडलेला नो बॉल भारताला महागात पडला. 

प्रथम फलंदाजी करताना भारताने ७ बाद २७४ धावांचे आव्हानात्मक मजल मारली. हे लक्ष्य दक्षिण आफ्रिकेने ५० षटकांत ७ फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. आफ्रिकेला अखेरच्या षटकात ७ धावांची गरज असताना दीप्तीच्या दुसऱ्या चेंडूवर तृषा चेट्टी धावबाद झाली. यानंतर दोन चेंडूंवर दोन धावा काढल्यानंतर पाचव्या चेंडूवर मिगनोन डू प्रीझ लाँग ऑनला झेलबाद झाली; पण हा चेंडू नो बॉल ठरला आणि आफ्रिकेसाठी दोन चेंडूत दोन धावा असे समीकरण झाले. भारताच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांनी उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला आहे. त्याआधी, भारताने स्मृती मानधना, शेफाली वर्मा आणि कर्णधार मिताली राज यांच्या अर्धशतकाच्या जोरावर आव्हानात्मक मजल मारली होती .

 स्मृती-शेफाली यांनी ९१ धावांची सलामी देत भारताला चांगली सुरुवात करून दिली. शेफालीने ४६ चेंडूंत ८ चौकारांसह ५३ धावा केल्या. तिच्या पाठोपाठ यास्तिका भाटियाही (२) झटपट परतल्यानंतर स्मृती-मिताली या अनुभवी जोडीने ८० धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. स्मृती-मिताली बाद झाल्यानंतर हरमनप्रीत कौरने ५७ चेंडूंत ४ चौकारांसह ४८ धावा करीत भारताला मोठी धावसंख्या उभारून दिली.

या लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेची सुरुवात अडखळती झाली. मात्र, लॉरा वॉल्वार्डट (८०) आणि लारा गुडॉल (४९) यांनी दुसऱ्या बळीसाठी १२५ धावांची भक्कम भागीदारी केली. यानंतर आफ्रिकेने ठरावीक अंतराने बळी गमावले. परंतु, सामनावीर ठरलेल्या प्रीझने ६३ चेंडूंत नाबाद ५२ धावांची मोलाची खेळी करीत संघाच्या विजयावर शिक्का मारला. राजेश्वरी गायकवाड आणि हरमनप्रीत कौर यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. ———————संक्षिप्त धावफलक :भारत : ५० षटकांत ७ बाद २७४ धावा (स्मृती मानधना ७१, मिताली राज ६८, शेफाली वर्मा ५३; मसाबता क्लास २/३८, शबनिम इस्माइल २/४२.) पराभूत वि. दक्षिण आफ्रिका : ५० षटकांत ७ बाद २७५ धावा (लॉरा वॉल्वार्डट ८०, मिगनोन डु प्रीझ नाबाद ५२, लारा गुडॉल ४९; हरमनप्रीत कौर २/४२, राजेश्वरी गायकवाड २/६१.)

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघमहिला टी-२० क्रिकेटद. आफ्रिका
Open in App