Join us  

भारतीय खेळाडूंची सकारात्मक देहबोली ठरली निर्णायक

पहिल्या टी२० सामन्यातील पराभवानंतर खडबडून जागे झालेल्या टीम इंडियाने दुसऱ्या सामन्यात यजमान न्यूझीलंडला सहजपणे नमवत जबरदस्त पुनरागमन केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2019 4:49 AM

Open in App

- अयाझ मेमन (संपादकीय सल्लागार)पहिल्या टी२० सामन्यातील पराभवानंतर खडबडून जागे झालेल्या टीम इंडियाने दुसऱ्या सामन्यात यजमान न्यूझीलंडला सहजपणे नमवत जबरदस्त पुनरागमन केले. पहिल्या लढतीत भारताला अत्यंत वाईट पराभव पत्करावा लागला. टी२० मध्ये असा पराभव भारतीय संघाचा कधीच झाला नव्हता. त्यात भारतीय संघ मालिका पराभवाच्या उंबरठ्यावर आला होता. त्यामुळे दुसरा सामना भारतीयांसाठी अत्यंत महत्त्वाचा बनला होता. पण टीम इंडियाने शुक्रवारी आपल्या लौकिकानुसार तगडा खेळ करीत शानदार पुनरागमन केले. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा सर्वच क्षेत्रांत भारतीय संघ चमकला. या सामन्याचे विश्लेषण करायचे म्हणजे, भारताचा हा विजय सहज वाटतो. कारण खेळाडूंनी यासाठी खूप मेहनत घेतली होती. सर्वप्रथम गोलंदाजांनी पूर्ण योगदान दिल्यानंतर फलंदाजांनी आपली जबाबदारी पार पाडली. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे भारतीय संघाची देहबोली कमालीची सकारात्मक होती.रोहित शर्माने या सामन्यात विशेष छाप पाडली. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये तो चांगलाच तरबेज आहे. आजच्या खेळीतून त्याने स्वत:चा दर्जा पुन्हा एकदा सिद्ध केला. ज्या सहजतेने आणि पूर्ण क्षमतेने तो खेळतो ते प्रेक्षणीय असते. त्याचा वेग पाहता, भारत १५व्या षटकापर्यंतच बाजी मारेल असे वाटत होते. तसेच, तो बाद झाल्यानंतर भारताच्या पराभवाची शक्यता खूप कमी झाली होती, हे विशेष. त्याची खेळी नक्कीच निर्णायक ठरली.महेंद्रसिंग धोनी व रिषभ पंत यांनीही चांगला खेळ केला. दोघेही वेगवेगळ्या पिढीतील असले, तरी त्यांच्यात तुलना होत आहे. धोनी आपल्या उमेदीच्या काळात ज्या आक्रमकतेने खेळायचा, त्याच पद्धतीने पंत आता खेळत असल्याचे दिसून येत आहे. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, धोनी ज्या प्रकारे पंतला सांभाळून घेतो ते खूप महत्त्वाचे आहे. धोनी नेहमी पंतला मार्गदर्शन करत असतो. त्यामुळे भविष्याच्या दृष्टीने पंतसाठी हा खूप महत्त्वाचा काळ आहे.सामन्यात डीआरएस प्रणालीमुळे वादही घडला. डॅरील मिशेलला ज्या प्रकारे तिसºया पंचांनी बाद दिले ते वादग्रस्त ठरले. चेंडू बॅटला लागून पॅडवर आदळल्याचे स्पष्ट दिसत असतानाही मिशेलला बाद ठरविण्यात आले. त्यामुळे कोणत्या आधारे त्याला बाद ठरविण्यात आले ते कळाले नाही. भारतासाठी अष्टपैलू कृणाल पांड्याने अचूक मारा केला. डेथ ओव्हर्समध्येही भारतीयांनी टिच्चून मारा करीत यजमानांना फटकेबाजीपासून रोखले. शिवाय फलंदाजीतही भारताने यजमानांवर वर्चस्व राखले.

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडभारतीय क्रिकेट संघ