Join us  

IPL 2020 खेळवणारच, BCCIने कसली कंबर; सौरव गांगुलीनं राज्य संघटनांना पाठवले पत्र

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( आयसीसी) बैठकीत अजूनही ट्वेंटी-20 वर्ल्ड कप बाबत ठाम भूमिका घेण्यात आलेली नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 10:25 AM

Open in App

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची ( आयसीसी) बुधवारी मॅरेथॉन बैठक झाली. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप बाबत आयसीसीनं अजूनही 'वेट अँड वॉच' ही भूमिका घेतली आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला ( बीसीसीआय) इंडियन प्रीमिअर लीगबाबत ( आयपीएल) अजूनही ठोस निर्णय घेता येत नाही. पण, आयसीसीच्या बैठकीनंतर बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीनं राज्य संघटनांना पत्र पाठवून यंदा आयपीएल होणारच, असा स्पष्ट संदेश पाठवला. 

आयपीएल न झाल्यास बीसीसीआयला 4000 कोटींचा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बीसीसीआयला हे नुकसान होऊ द्यायचे नाही. त्यामुळे प्रेक्षकांशिवायही आयपीएल खेळवण्यास बीसीसीआय तयार आहे.  ''यंदा आयपीएल खेळवण्याच्या सर्व पर्यायांवर बीसीसीआय चर्चा करत आहे आणि आयपीएल खेळवण्याचा निर्धार पक्का आहे. प्रेक्षकांविना खेळावे लागले, तरी आमची तयारी आहे. चाहते, फ्रँचायझी, खेळाडू, ब्रॉडकास्टर, स्पॉन्सर्स आणि अन्य भागीदार हेही आयपीएल खेळवण्यासाठी सकारात्मक आहेत,''असे गांगुलीच्या पत्रात नमूद केले गेले आहे. 

भारतीय खेळाडूच नव्हे, तर परदेशी खेळाडूंनीही आयपीएलच्या पारड्यात त्यांच मत टाकलं आहे. त्यामुळे आयपीएल कोठेही खेळवली गेली, तरी त्यात खेळण्याची तयारी परदेशी खेळाडूंनी दर्शवली आहे. त्यामुळे आता बीसीसीआय लवकरच त्यांच्या प्लान सांगेल, असेही गांगुलीच्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. ''देशी-परदेशी खेळाडूंनीही आयपीएलमध्ये खेळण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे आम्ही अजूनही आशावादी आहोत आणि लवकरच त्याबाबतचा प्लान ठरवण्यात येईल,''असे पत्रात लिहिले आहे.

पॅट कमिन्स, जोस बटलर, ग्लेन मॅक्सवेल, स्टीव्ह स्मिथ आणि अन्य परदेशी खेळाडूंनी यंदा आयपीएल खेळवल्यास त्यात सहभाग घेण्याची तयारी दर्शवली आहे.

आयपीएलच्या 13व्या मोसमासाठी बीसीसीआय सप्टेंबर-ऑक्टोबर आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर या विंडोची चाचपणी करत आहेत. यंदा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप न झाल्यास 25 सप्टेबंर ते 1 नोव्हेंबर या कालावधीत आयपीएल आयोजित करण्याची तयारी बीसीसीआयनं केली आहे. कोरोना व्हायरसमुळे भारतातील परिस्थिती न सुधारल्यास आयपीएल श्रीलंका किंवा संयुक्त अरब अमिराती येथे होऊ शकते. दोन्ही देशांनी तसा प्रस्ताव बीसीसीआयसमोर ठेवला आहे.  

टॅग्स :आयपीएल 2020सौरभ गांगुलीबीसीसीआय