लंडन : स्वत:च्या नेतृत्वाखाली चार कसोटी सामने गमावल्यानंतर विराट कोहलीच्या नेतृत्वाविषयी वादविवाद रंगले आहेत. यावर इंग्लंडचा माजी कर्णधार केव्हिन पीटरसन याने या चर्चेला अर्थ नसल्याचे आणि ही चर्चा अनावश्यक असल्याचे म्हटले आहे. पण चार सामने गमावल्यामुळे ही चर्चा होत राहणार, असेही स्पष्ट केले.
“भारतात कसोटी कर्णधारपदावरून होणारी चर्चा टाळणे अशक्य आहे. कर्णधार म्हणून विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सलग चार सामने हरला. त्याचवेळी रहाणेने ऑस्ट्रेलियातील भारताच्या मालिका विजयाचे नेतृत्व केले,” असे पीटरसनने ‘बेटवे’साठी लिहिलेल्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे. ऑस्ट्रेलियात मिळालेल्या विजयानंतर कोहलीला हटवून रहाणेला नेतृत्व सोपवायला हवे, या चर्चेला ऊत आला होता.
पितृत्व रजा संपवून विराट कोहली पुन्हा एकदा नियमित कर्णधार म्हणून परतला आहे. पण इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला.