- अनन्या भारद्वाज, मुक्त पत्रकारअपुऱ्या दिवसांचं बाळ जन्माला आलं. डॉक्टरांनी सांगितलं होतं की या मुलाची फुप्फुसं कमकुवत आहेत. जगेल की नाही अशी गत. पण ते मूल जिद्दीने जगलं. पुढे डॉक्टर म्हणाले, याला कुठलातरी खेळ खेळू द्या, त्याच्या फुप्फुसांची ताकद वाढली पाहिजे. म्हणून मग त्याला क्रिकेट खेळायला पाठवणं सुरू झालं. करुण नायरची ही गोष्ट! तोच करुण जो बुमराहसारख्या बॉलरला परवा फोडून काढत होता, जणू काही बुमराह काय चेंडू टाकणार हे त्याला दिसत होतं. पण त्या दिवशी जगाला दिसलेला बेडर यशस्वी करुण नायर ही त्याची गोष्ट नाही. जगण्यामरण्याचाच संघर्ष करणाऱ्या, अस्तित्व कायमच पणाला लावणाऱ्या माणसाची ही अपयशी पण ‘यशस्वी’ गोष्ट आहे.
आई-वडील केरळी. हा जन्मला राजस्थानात. कारण मॅकेनिकल इंजिनिअर वडिलांची तिथं बदली होती. पुढे त्यांची बदली बंगळुरूत झाली. चिन्नास्वामी स्टेडियमच्या स्प्रिंकल सिस्टीमचं काम ते पाहत होते. त्याच काळात हा मुलगा क्रिकेट खेळत होता. उत्तम बॅटिंग, तंत्र चांगलं आणि शॉट्स भरपूर.
कर्नाटककडून रणजी खेळून भारतीय संघापर्यंत पोहोचला. त्यानं आयपीएलही गाजवल्या. दिल्ली संघाचा कप्तानही झाला. देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडत होता. ‘संधी समोर उभी राहून वाकुल्या दाखवते, पण आपला हात धरत नाही’, असं त्याच्या बाबतीत अनेकदा झालं.
२०१६. भारतीय संघात निवड झाली म्हणून तो केरळात देवदर्शनाला जात होता. बोट उलटून अपघात झाला. याचा जीव वाचला, पण क्रिकेटच्या नाकातोंडात पाणी गेलं. सगळी दारं तोंडावर बंद होऊ लागली. १७ डिसेंबर २०२२ रोजी त्यानं एक ट्वीट केलं, ‘डीअर क्रिकेट, गिव्ह मी वन मोअर चान्स!’
आज ते ट्वीट व्हायरल असलं तरी तेव्हा त्याची थट्टाच झाली. पण विदर्भाकडून रणजी खेळत करुणनं धावा चोपल्या. विजय हजारे ट्राॅफीसाठी तर ५४०हून जास्त धावा केल्या. आणि परवा, आयपीएल सामन्यात जगातला सर्वोत्तम बॉलर बुमराह त्याच्यासमोर हतबल उभा होता.. शेवटी क्रिकेटनं त्याला एक संधी द्यायची ठरवलंच..!