Join us  

David Warner Bowled, IPL 2022: "एलईडी स्टंपवरच्या बेल्स काढून टाका.."; भारतीय माजी क्रिकेटपटूचा सल्ला

दिल्ली-राजस्थान सामन्यातील घटनेनंतर दिला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 9:01 PM

Open in App

David Warner Bowled, IPL 2022: दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील बुधवारी डीवाय पाटील स्टेडियमवर झालेल्या सामन्यात एक विचित्र घटना घडली. युझवेंद्र चहलने टाकलेल्या चेंडूवर डेव्हिड वॉर्नर खेळत असताना चेंडू स्टंपवर लागला. स्टंपमधील LED चे दिवेही लागले, पण बेल्स न पडल्याने त्याला नाबाद ठरवण्यात आले. या घटनेनंतर भारताचा माजी फलंदाज संजय मांजरेकर यांनी आधुनिक क्रिकेटमध्ये स्टंपवरील बेल्स काढून टाकण्याचा सल्ला दिला.

दिल्लीच्या संघाने १६१ धावांच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला. त्यावेळी ९व्या षटकात वॉर्नर नशीबवान ठरला. चहलच्या एका षटकातील शेवटचा चेंडू त्याच्या बॅटनंतर स्टंपला लागला, परंतु बेल्स खाली पडली नाही. त्यामुळे वॉर्नरला जीवदान मिळाले. त्यानंतर तो संपूर्ण सामन्यात ५२ धावांवर नाबादच राहिला. त्याला मिचेल मार्शच्या ६२ चेंडूत ८९ धावांची साथ मिळाली आणि दिल्लीचा आठ विकेट्स राखून विजय झाला.

एका क्रीडा वाहिनीशी बोलताना संजय मांजरेकर म्हणाले, "मी हे आधीही सांगितले आहे की आता एलईडी स्टंप आहे. त्यामुळे त्याच्या बेल्स लावण्याची गरज नाही. सामन्यात चहलला विकेट मिळू शकली असती. त्याने शानदार गोलंदाजी केली होती. पण बेल्स मुळे विकेट मिळू शकली नाही. आता मला असं वाटतं की आधुनिक क्रिकेटमध्ये स्टंपना बेल्सपासून मुक्ती मिळायला हवी, कारण ते आता एलईडी तंत्रज्ञानाने खेळत आहेत."

दरम्यान, सामन्यात प्रथम फलंदाजी करताना राजस्थानच्या संघाकडून आर अश्विनने दमदार अर्धशतक ठोकलं. त्याने ३८ चेंडूत ५० धावा केल्या. त्याशिवाय देवदत्त पडिक्कलने ४८ धावांची खेळी केली. त्यामुळे राजस्थानने दिल्लीला १६१ धावांचे आव्हान दिले. प्रत्युत्तरात मिचेल मार्शने ६२ चेंडूत ८९ धावा केल्या. तर डेव्हिड वॉर्नरने ४१ चेंडूत नाबाद ५२ धावा केल्या. अखेर, रिषभ पंतने नाबाद १३ धावा ठोकत संघाला विजय मिळवून दिला.

टॅग्स :आयपीएल २०२२डेव्हिड वॉर्नरदिल्ली कॅपिटल्सयुजवेंद्र चहल
Open in App