Join us

दक्षिण आफ्रिकेच्या पराभवात टीम इंडियाचा हात? विक्रमी सेंच्युरीनंतर मिलरनं व्यक्त केली खंत, म्हणाला...

न्यूझीलंड विरुद्धच्या पराभवानंतर डेविड मिलरनं आयसीसीच्या वेळापत्रकावर प्रश्नचिन्ह उपस्थितीत करत मनातील खदखद व्यक्त केलीये.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 14:30 IST

Open in App

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील दुसऱ्या सेमी फायनल लढतीत दक्षिण आफ्रिकेच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला.  न्यूझीलंड संघानं दिलेल्या विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना 'किलर' डेविड मिलरनं विक्रमी शतक झळकावले. ६७ चेंडूत शतकी डाव साधत त्याने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सर्वात जलद शतकाची नोंद केली. पण हे विक्रमी शतक संघाच्या कामी आले नाही. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!  

विक्रमी शतकानंतर संघ पराभूत, मिलरनं ICC च्या वेळापत्रकावर उपस्थितीत केले प्रश्नचिन्ह

न्यूझीलंड विरुद्धच्या पराभवानंतर डेविड मिलरनं आयसीसीच्या वेळापत्रकावर प्रश्नचिन्ह उपस्थितीत करत मनातील खदखद व्यक्त केलीये. त्याने अप्रत्यक्षरित्या भारताच्या सोयीमुळे दक्षिण आफ्रिकेची मोठी गैरसोय झाल्याचेच बोलून दाखवलं आहे. नेमकं तो काय म्हणाला? जाणून घेऊयात टीम इंडियामुळं पुन्हा दक्षिण आफ्रिकेच्या संघावरील चोकर्सचा ठपका कायम राहिला का? असा प्रश्न निर्माण करणारी मिलरच्या मनातली गोष्ट

 काय म्हणाला डेविड मिलर?

"इंग्लंड विरुद्धच्या सामन्यानंतर दुसऱ्या दिवशी लवकर उठून आम्हाला दुबईला जाण्याची तयारी करावी लागली. दुपारी साडे चार वाजता आम्ही  दुबईत पोहचला. त्यानंतर सकाळी साडेसात वाजता पुन्हा आम्हाला पाकिस्तानात परतावे लागले. पाकिस्तान ते दुबई फ्लाइटमधून प्रवासाचे अंतर हे फक्त १ तास ४० मिनिटांचे आहे. आम्ही पाच तास फ्लाइटमधून प्रवास केला नाही हे खरंय. रिकव्हरीसाठी आमच्याकडे वेळही होता. पण ही परिस्थितीत उत्तम नव्हती." असे डेविड मिलरन म्हटले आहे.

लाहोर ते दुबई अन् दुबई ते लाहोर! दक्षिण आफ्रिकेच्या संघाची 'कसरत'

दक्षिण आफ्रिकेच्या संघानं साखळी फेरीतील सर्व सामने पाकिस्तानमधील स्टेडियमवर खेळले. साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात त्यांनी इंग्लंडला पराभूत करत सेमीचं तिकीट पक्के केले. या सामन्यातील विजयासह दक्षिण आफ्रिकेच्या संघानं आपल्या गटात अव्वलस्थान मिळवले. दुसऱीकडे ऑस्ट्रेलिया संघ दुसऱ्या स्थानावर राहिला. 'अ' गटात भारत-न्यूझीलंड यांच्यातील साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यानंतर पहिल्या सेमीत भारताविरुद्ध कोण खेळणार यासंदर्भातील चित्र स्पष्ट झाले. पण हे चित्र स्पष्ट होण्याआधीच ऑस्ट्रेलियासह दक्षिण आफ्रिकेच्या संघालाही दुबईची फ्लाइट पकडावी लागली होती. न्यूझीलंड विरुद्ध भारत जिंकला अन् न्यूझीलंड विरुद्ध दुसरी सेमी फायनल खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघाला पुन्हा लाहोरची फ्लाइट पकडवी लागली. या मुद्यावरून डेविड मिलरनं आयसीसीच्या वेळापत्रकावर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले आहे. 

टॅग्स :चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५भारत विरुद्ध न्यूझीलंडद. आफ्रिकान्यूझीलंडदुबईपाकिस्तान