CWG 2022: India vs Barbados : जेमिमा रॉड्रीग्ज, दीप्ती शर्मा व शेफाली वर्मा यांच्या फटकेबाजीनंतर रेणुका सिंग ठाकूरने केलेल्या कमालीच्या गोलंदाजीच्या जोरावर भारतीय महिलांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. साखळी गटातील अखेरच्या सामन्यात भारतीय महिलांनी सांघिक खेळ करताना बार्बाडोसचा सहज पराभव केला. अ गटातून ऑस्ट्रेलिया व भारत यांनी उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले आहे.
बार्बाडोसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. स्मृती मानधना व शेफाली वर्मा यांनी भारताच्या डावाची सुरुवात केली. स्मृतीने एक धाव घेताच रोहितच्या विक्रमाशी बरोबरी केली. पण, ५ धावांवर ती LBW होऊन माघारी परतली. भारताकडून आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून २०००+ धावा करणारी स्मृती दुसरी खेळाडू ठरली. रोहितने सलामीवीर म्हणून २९७३ धावा केल्या आहेत, तर स्मृतीने आज २००४ धावांचा टप्पा गाठला. शिखर धवन १७५९, मिताली राज १४०७ व लोकेश राहुल १३९२ असा पुढील क्रमांक आहे. स्मृती बाद झाल्यानंतर शेफाली व जेमिमा रॉड्रीग्ज यांनी ७१ धावांची भागीदारी केली. शेफाली २६ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारांसह ४३ धावांवर रन आऊट झाली.