कोहलीच्या नेतृत्वाखालील वर्तमान संघ सर्वोत्तम - सुनील गावसकर

यापूर्वीच्या संघांच्या तुलनेत वेगवान गोलंदाजीचे आक्रमण दर्जेदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2020 01:34 IST2020-08-24T01:34:08+5:302020-08-24T01:34:29+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
The current team under Kohli is the best - Sunil Gavaskar | कोहलीच्या नेतृत्वाखालील वर्तमान संघ सर्वोत्तम - सुनील गावसकर

कोहलीच्या नेतृत्वाखालील वर्तमान संघ सर्वोत्तम - सुनील गावसकर

नवी दिल्ली : विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील वर्तमान संघ भारताचा आतापर्यंतचा सर्वोत्तम कसोटी संघ असल्याचे मत आपल्या काळातील दिग्गज फलंदाज सुनील गावसकर यांनी व्यक्त केले. याबाबत कारण विषद करताना ते म्हणाले की यापूर्वीच्या संघांच्या तुलनेत सध्याचा भारतीय संघ अधिक समतोल आहे.

कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले तर संघ सध्या विश्व कसोटी चॅम्पियनशिप तालिकेत अव्वल स्थानी आहे. या संघाने २०१८-१९ मध्ये आॅस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात पराभूत करण्याचा पराक्रम केला. अशी कामगिरी करणारा हा पहिलाच भारतीय संघ ठरला.

एका कार्यक्रमामध्ये सुनील गावसकर म्हणाले, ‘सध्याचा भारतीय कसोटी संघ संतुलन, क्षमता, कौशल्य व प्रतिबद्धता यात आतापर्यंतचा सर्वोत्तम भारतीय संघ आहे. मी यापेक्षा सरस भारतीय संघाबाबत विचार करू शकत नाही.’

गावसकर पुढे म्हणाले, वर्तमान संघाची विशेषता ही त्यांचे विविधतापूर्ण गोलंदाजी आक्रमण आहे. हा संघ कुठल्याही खेळपट्टीवर आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये विजय मिळविण्यात सक्षम आहे. या संघाला अनुकूल परिस्थितीची गरज नाही. परिस्थिती कशीही असली तरी कुठल्याही खेळपट्टीवर हा संघ विजय मिळवू शकतो. फलंदाजीचा विचार करता १९८० च्या संघही बऱ्याच अंशी असेच असायचे, पण त्यांच्याकडे विराटकडे जसे गोलंदाज आहेत तसे गोलंदाज नव्हते.’

गावसकर फलंदाजीबाबत यांनी पुढे सांगितले की, ‘सध्याचा भारतीय कसोटी संघ आॅस्ट्रेलियासारख्या संघापेक्षा अधिक धावा फटकावू शकतो. त्यामुळे भारतीय संघ कसोटी मानांकनामध्ये अव्वल स्थानी आहे. तुम्हाला धावाही फटकाव्या लागतात. आपण २०१८ मध्ये इंग्लंडमध्ये बघितले. आपण २०१७ मध्ये दक्षिण आफ्रिका दौºयातही अनुभवले.’

त्याचप्रमाणे, ‘आपण प्रत्येकवेळी २० बळी घेतले, पण पुरेशा धावा फटकावता आल्या नाही. पण, आता मला वाटते की, आपल्याकडे असे फलंदाज आहेत जे आॅस्ट्रेलियन संघाच्या तुलनेत अधिक धावा फटकावू शकतात,’ असेही सुनील गावसकर यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)

भारताच्या जागतिक दर्जाच्या गोलंदाजांबाबत बोलताना गावस्कर म्हणाले,‘निश्चितच भारताकडे आज विविधतापूर्ण गोलंदाजी आक्रमण आहे. जर २० बळी घेता येत नसेल तर सामना जिंकता येत नाही, असे म्हटल्या जाते. आम्ही आॅस्ट्रेलियात २० बळी घेण्यालायक गोलंदाजी केली.’ आता भारतीय संघात जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, ईशांत शर्मा, उमेश यादव व भुवनेश्वर कुमार यांच्यासारखे वेगवान गोलंदाज आहे. या गोलंदाजांच्या समावेशामुळे अलीकडच्या कालावधीत भारतीय संघ जगातील अव्वल संघ ठरला आहे.

Web Title: The current team under Kohli is the best - Sunil Gavaskar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.